Nagpur : बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मित्राचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nagpur : बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मित्राचा खून

नागपूर : दारू पिऊन बहिणीला अपशब्द बोलल्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या मित्राचा युवकाने खून केला. ही घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास गड्डीगोदाम परिसरात घडली. प्रणव राजेश पात्रे (२५), इंदोरा, बाराखोली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सत्येंद्र यादव (२३), मानकापूर असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक राजेश व आरोपी सत्येंद्र हे मित्र होते. प्रणव पात्रे हा भंगार खरेदी-विक्रीचा तर सत्येंद्र हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दोघांवरही काही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजता प्रणव पात्रे हा दारूच्या नशेत गड्डीगोदाम चौकातील सेंट मायकल शाळेसमोरील मैदानावर बसला होता. त्याने आपला मित्र सत्येंद्रला तेथे बोलावले. दोघेही पुन्हा दारू पिण्यासाठी निघून गेले.

बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मित्राचा खून

काही तासानंतर ते परत गड्डीगोदाम चौकात आले. ‘तुझ्या बहिणीच्या वागणुकीत बदल झाला आहे. ती अनेक मुलांशी बोलत असते.’असे म्हणत राजेशने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली. बहिणीबाबत असे शब्द ऐकून सत्येंद्रला राग आला. त्याने पाठीमागे ठेवलेला चाकू काढून प्रणवच्या पोटात खुपसला. नंतर गळ्यावर वार केला. तसेच चाकूच्या वाराने गंभीर जखमी प्रणवला खूप दूरपर्यंत फरफटत नेऊन मारहाण केली. यामध्ये प्रणवचा मृत्यू झाला. माहिती मिळताच सदर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी लगेच मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी पळून गेलेला आरोपी सत्येंद्रला अटक केली. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.