
नागपूर : चंद्रमणीनगर उद्यानाचा कचरा!
नागपूर : दक्षिण नागपुरातील अनेक मैदाने, उद्यान नागपूर सुधार प्रन्यास व महापालिकेच्या अनास्थेचे बळी ठरत असल्याचे चित्र आहे. चंद्रमणीनगर उद्यानही याला अपवाद नसून, येथील लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य जुने झाले असून, ठिकठिकाणी तुटले आहे. परंतु हट्टी मुले तिथे खेळण्यास जात असल्याने अनेकदा ते जखमी होतात. कचरा तर उद्यानाच्या पाचवीलाच पुजला असून, येथील कोपऱ्यात अक्षरशः कचरा संकलन केंद्रच तयार झाले. त्यामुळे आरोग्य सुदृढ करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रीन जीमचे साहित्यही तुटले असल्याने या परिसरातील नागरिकांनी बाहेर उद्यानांमध्ये भटकावे लागते.
दक्षिण नागपुरातील अनेक उद्यानांपैकी एक असलेल्या चंद्रमणीनगरात नागपूर सुधार प्रन्यासने उद्यान तयार केले. येथे ग्रीन जीम, लहान मुलांची खेळणी लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु तयार केल्यानंतर देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्याची परंपरा नासुप्रनेही कायम ठेवल्याचे चित्र आहे. या उद्यानामध्ये चंद्रमणीनगर, बाबूळखेडा, नवीन बाबुळखेडा, रिपब्लिकन वसाहत, कैलासनगर, कुकडे ले-आऊट, अजनी पोलिस स्टेशनचा मागील भागातील नागरिक येतात. परिसरात हिरवळ, झाडे असलेले एकमेव उद्यान असल्याने नागरिकांचा कल या उद्यानात फिरण्याकडे असते. परंतु गेल्या काही महिन्यांत फिरायला येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत असून उद्यानातील कचरा, तुटलेली बाके, खेळणी, ग्रीन जीम बघता प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. उद्यानात सातत्याने स्वच्छता होत नसल्याने नागरिकांनी तुटलेल्या साहित्याच्या दुरुस्तीची अपेक्षाच सोडून दिली.
या उद्यानाच्या दुर्दशेबाबत प्रभाग ३३ मधील तत्कालीन सर्वच नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रार केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. उद्यानाच्या कोपऱ्यात जणू कचरा संकलन केंद्रच तयार झाल्याचे दिसून येते. फिरायला येणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. लहान मुलांसाठी असलेली घसरपट्टी व इतर साहित्याला मोठमोठे छिद्र पडले आहेत. परंतु हट्ट करीत मुले तिथे खेळायला जातात. त्यामुळे एका मुलाच्या पार्श्वभागाला चांगलीच जखम झाल्याचे एका नागरिकाने नमूद केले. ग्रीन जीमचे साहित्य तुटले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना व्यायामासाठी इतर भागातील उद्यानांकडे जावे लागते. काहींची व्यायामाची सवयच संपुष्टात आली. देखभाल, दुरुस्तीअभावी एका चांगल्या उद्यानाचा बळी जाण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली.
शिपाई बेपत्ता, असामाजिक तत्त्वांचा वावर
या उद्यानाची देखरेख ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी शिपाई होता. परंतु आता शिपाई नसल्याने अंधरा होताच असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या परिसरातील तरुण मुलींना बाहेर निघणे कठीण झाले आहे. एवढेच नव्हे नागरिकांनाही सायंकाळी फिरता येत नाही.
घाणीमुळे आरोग्यालाही धोका
देखभाल दुरुस्ती नसल्याने श्वान, गायी दुपारी येथे वास्तव्यास येतात. गायींनी येथील झाडे फस्त केली. श्वान येथे घाण करून ठेवत असून, स्वच्छता कर्मचारी नसल्याने स्वच्छताही होत नाही. बसण्याची बाकंही तुटली आहेत. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
Web Title: Nagpur Garbage Chandramaninagar Park
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..