Nagpur : अजूनही नर्सिंगचे वर्ग होस्टेलमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur General Nursing School Hostel

Nagpur : अजूनही नर्सिंगचे वर्ग होस्टेलमध्ये

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. ७५ वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे वर्ग ‘सदर’मध्ये भरायचे. याच दरम्यान मेडिकलमध्ये जनरल नर्सिंग स्कूल सुरू झाले. नर्सिंग स्कूलसाठी स्वतंत्र इमारतीचा नकाशा मेडिकलची इमारत तयार होतानाच मंजूर झाला, तशी मेडिकलच्या नकाशात नोंद आहे. पण भूखंड अद्यापही मोकळाच आहे. बीएसस्सी आणि एमएस्सी नर्सिंगचे विद्यार्थी याच वसतिगृहात परिचर्या व्यवसायाचे धडे घेत आहेत.

आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे, तर मध्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे रुग्णालय अशी मेडिकलची ओळख आहे. या मेडिकलच्या बांधकामाचा नकाशा १९५८ मध्ये मंजूर झाला. सोबतच जागाही निश्‍चित झाली होती. वर्गखोल्यांपूर्वी वसतिगृहाचे बांधकाम झाले. यामुळे नर्सिंगच्या पहिल्या तुकडीने वसतिगृहातच प्रशिक्षण घेऊन परिचर्या अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु, त्यानंतर वसतिगृहाच्या समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर नर्सिंगची स्वतंत्र इमारत तयार होणे आवश्‍यक होते.

तसे प्रस्ताव मेडिकल प्रशासनाकडून शासनाकडे पाठवणे आवश्‍यक असताना चालढकल वृत्तीमुळे गेल्या साठ वर्षांत प्रस्तावच तयार झाला नाही.सलग पंचेचाळीस वर्षे जनरल नर्सिंग अभ्यासक्रम होस्टेलमध्ये (वसतिगृहात) सुरू राहिले. मेडिकल प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे हे उदाहरण आहे, हे मात्र निश्‍चित. पन्नास वर्षांत मंजूर नकाशात असलेल्या स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाच्या विषयावर आज मेडिकल प्रशासन बोलण्यास टाळाटाळ करीत आहेत.

जनरल नर्सिंग २००६ मध्ये बंद

जनरल नर्सिंग स्कूल २००६ मध्ये बंद झाले. आणि नर्सिंग अभ्यासक्रमात गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी मेडिकलमध्ये बीएस्सी नर्सिंग कॉलेज सुरू झाले. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची पहिली तुकडीही नर्सिंगच्या वसतिगृहात प्रशिक्षण घेऊ लागली. १६ वर्षांपासून बीएस्सी नर्सिंगचेही वर्ग याच वसतिगृहाच्या इमारतीमध्ये होत आहेत. नुकतेच २०२२ मध्ये एमएसस्सी नर्सिंगच्या पहिल्या तुकडीचा प्रवेश झाला आहे. मात्र बीएसस्सीनंतर आता एमएसस्सी नर्सिंगचे प्रशिक्षणार्थीदेखील वसतिगृहाच्या इमारतीमध्ये शिक्षण घेत आहेत.

जेवणाच्या खोलीत वर्ग

येथील दोन तीन खोल्यांच्या मध्ये असलेले पार्टिशन तोडून सलग वर्ग खोली तयार करून येथे वर्ग होत आहेत. जेवणाच्या खोल्यांना वर्गखोल्या बनवण्याचे अफलातून काम संबंधित प्रशासनाने केले. परंतु, साठ वर्षे स्वतंत्र इमारतीची खबरबात लागू दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Nagpur Government Medical College And Hospital General Nursing School Hostel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..