
नागपूर : शाळा सुरू होण्यापूर्वीच मिळणार अनुदान
नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना देण्यात येणारे संयुक्त शाळा अनुदान यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळांना वितरित करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला समग्र शिक्षा अभियान राज्य कार्यालयाकडून १ कोटी ५९ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा निधीही मिळाला.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या संयुक्त शाळा अनुदानात वाढ केली आहे. त्यामध्ये इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शाळांना पटसंख्येच्या आधारावर अनुदान उपलब्ध करून दिल्या जाते. १ ते ३० पटसंख्येपर्यंतच्या शाळांना वर्षाला ५ हजार, ३१ ते १०० पटसंख्येपर्यंतच्या शाळांना १२ हजार ५०० रुपये, १०१ ते २५० पटसंख्येपर्यंत २५ हजार, २५१ ते १००० पटसंख्येपर्यंतच्या शाळांना ५० हजारापर्यंतचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या अनुदानातून विद्युत बिल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छताविषयक बाबी, इमारत देखभाल व दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, क्रीडा साहित्य दुरुस्ती, प्रयोगशाळा, रंगरंगोटी, खेळाचे मैदान तयार करणे व इतर आवश्यक भौतिक सुविधेवर खर्च कराव लागतो.
जिल्हा परिषद अंतर्गत १५६५ शाळा असून, या शाळांना शाळा सुरू होण्यापूर्वी निम्मे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाला १ कोटी ५९ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी हा निधी शाळांना वळता होणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु शासनाकडून या निधी वितरणाबाबत कुठले निकष, सूचना प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे शाळांना निधी किती पाठवायचा, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.