नागपूर : चार मजली इमारतीतील सुपर बाजारला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Grocery cosmetics supermarket fire four storey building

नागपूर : चार मजली इमारतीतील सुपर बाजारला आग

नागपूर : शहरातील झिंगाबाई टाकळी परिसरातील पुरुषोत्तम सुपर बाजाराला शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत नऊ लाखांचे साहित्य जळाले. चार मजली इमारतीतील ग्राउंड फ्लोअरवरील सुपर बाजाराला लागलेल्या आगीमुळे येथील रहिवाशांच्या काळजीने अनेकांनी धाव घेतली. परंतु अग्निशमन विभागाच्या जवानांनी तासाभरातच ग्राउंड फ्लोअरवरील आगीवर नियंत्रण मिळवल्याने इमारतीतील नागरिकांची मालमत्ता व जीव दोन्ही वाचले.

झिंगाबाई टाकळी मुख्य रस्त्यावर अर्चना रिवेरा ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत ग्राउंड फ्लोअरवर गेल्या अनेक वर्षांपासून संजय छाबरिया व अंकित अग्रवाल यांच्या मालकीचा पुरुषोत्तम सुपर बाजार आहे. पहिल्या माळ्यापासून ते चौथ्या माळ्यापर्यंत निवासी गाळे आहेत. अनेक नागरिक येथे खरेदीसाठी येतात. परंतु आज सकाळी सात वाजताच्या सुमारास सुपर बाजार उघडण्यापूर्वीच आग लागली.

सुपर बाजारातून धूर बाहेर निघत असल्याचे दिसताच सुरक्षा रक्षक व परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत आग सुपर बाजारात पसरली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु सुपर बाजारातील किराणा साहित्य, सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, पीओपी, वीजेच्या तारा, पंखे, कुलर आदी जळाले.

परंतु आगीवर लवकरच नियंत्रण मिळाल्याने काही किराणा तसेच साहित्य वाचविले. परत ते विक्रीसाठी योग्य नसल्याचे समजते. एकूण नऊ लाखांचे नुकसान झाल्याचे अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ५५ लाखांची बचत करण्यात अग्निशमन विभागाला यश आल्याचेही अधिकाऱ्यांनी नमुद केले.

निवासी लोकांत दहशत

ग्राउंड फ्लोअरवर आग लागल्याने इमारतीतील पहिल्या ते चौथ्या माळ्यावरील रहिवासी नागरिक मुले, वृद्धांसह बाहेर आले. परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली. आगीमुळे या इमारतीतील नागरिक दहशतीत दिसून आले. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Nagpur Grocery Cosmetics Supermarket Fire Four Storey Building

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top