Nagpur News : विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड पारा ८.३ अंशांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

winter
नागपूर : विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड पारा ८.३ अंशांवर

राज्यात 'हुडहुडी' नागपूरमध्ये पारा ८.३ अंशांवर

गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील वातावरणात अचानक बदल झाला असून, आगामी दोन दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आत्ताच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा १० अंशांच्या खाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Maharashtra Winter Update)

कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गारठले आहेत. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीचा कहर सुरूच असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांतील पाऱ्यात पुन्हा मोठी घट झाली आहे. थंडीच्या तीव्र लाटेमुळे नागपूरच्या तापमानात दीड अंशाची घसरण होऊन पारा विदर्भात नीचांकीवर आला. हवामान विभागाने विदर्भात आणखी चोवीस तासांचा ‘येलो अलर्ट’ दिला असला तरी, त्यानंतरही काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा प्रभाव विदर्भात दिवसागणिक वाढत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या पाच दिवसांत नागपूरच्या तापमानात तब्बल सात अंशांची घसरण झाली. गुरुवारीही तापमानात दीड अंशांची घट होऊन पारा या मोसमात चौथ्यांदा दहाच्या खाली म्हणजेच ८.३ अंशांवर आला. नागपूरचे आजचे किमान तापमान विदर्भात सर्वात कमी ठरले. तशी नोंद प्रादेशिक हवामान विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. याशिवाय गोंदिया (८.८ अंश सेल्सिअस), बुलडाणा (८.८ अंश सेल्सिअस), ब्रम्हपुरी (९.८ अंश सेल्सिअस), अकोला (९.३ अंश सेल्सिअस), वर्धा (९.४ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (१० अंश सेल्सिअस) येथेही लाटेचा तीव्र प्रभाव जाणवला.

विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीचा प्रकोप सुरू आहे. गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे वैदर्भी त्रस्त असून, रात्रीसह दिवसाही गरम कपडे घालून फिरावे लागत आहे. थंडीची लाट या महिन्याअखेरपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता आहे.