Nagpur News : हेडफोन लावणे बेतले जीवावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

headphones Nagpur News

Nagpur News: हेडफोन लावणे बेतले जीवावर

Nagpur News : कानात हेडफोन लावून बोलण्यात भान हरपलेल्या विद्यार्थिनीचा रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.१८) सकाळी दहाच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

आरती भंडारा जिल्ह्यातील सातोना गावची रहिवासी होती. शिक्षणासाठी ती हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे राहायची. आरती डोंगरगावजवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.

बुधवारी सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर रेल्वे फाटकाच्या मार्गाने पायीच रेल्वे-स्थानकाकडे निघाली. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत जात होती.

रेल्वे फाटकाजवळ रेल्वेरूळ ओलांडताना बोलण्यात तल्लीन असल्याने तिला रेल्वेचा कुठलाही आवाज आला नाही. धडधडत येणारी रेल्वे स्थानकावरील इतरांना दिसली. त्यांनी मोठमोठ्याने

हेडफोन लावणे बेतले जीवावर

आरडाओरड करून आरतीला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हेडफोन लावून असलेल्या आरतीला त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकूच आला नाही आणि क्षणार्धात भरधाव पुणे-नागपूर रेल्वेखाली (गाडी क्र.२१२९) चिरडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

भरधाव रेल्वेने तिला तिला ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.