नागपूर : पहाटेच धो धो धुतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

नागपूर : पहाटेच धो धो धुतले

नागपूर : वरुणराजाने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत सोमवारी पहाटेच्या सुमारास उपराजधानीत तीन ते चार तास प्रचंड धुमाकूळ घातला. शहरात सर्वत्र बरसलेल्या धो-धो पावसाने पुन्हा रस्ते जलमय झाले होते. जागोजागी मिनी तलाव साचले. ठिकठिकाणी सखल भागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाले होते. पावसाचा फटका घरे व झोपड्यांनाच नव्हे, पॉश अपार्टमेंट्सनाही बसला. जागोजागी ट्राफिक जॅम झाल्याने शहरातील एकूणच दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रादेशिक हवामान विभागाने आणखी चोवीस तास नागपूरसह संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट दिल्याने मंगळवारीही जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.

रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह दमदार पाऊस बरसल्यानंतर पहाटे पुन्हा जोरदार तडाखा दिला. नागपूरकर साखरझोपेत असताना तीननंतर शहरात सगळीकडेच मेघराजा ‘जम के’ बरसला. जवळपास तीन ते चार तास पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. पहाटे सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत सुरू होता. जोरदार पावसामुळे अनेक ले-आऊटमध्ये पाणी तुंबले होते. अनेक चौकांना मिनी तलावाचे स्वरूप आले होते. शहरातील नदी-नाले दिवसभर तुडुंब भरून वाहिले. नरेंद्रनगर पुलाखाली कंबरेपर्यंत पाणी साचल्याने सकाळी कार्यालयांमध्ये जाणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने हॉटेल रॅडिसन ब्लूसमोरील उड्डाणपूलावरून न्यावी लागली. त्यामुळे नरेंद्रनगर चौक व वर्धा रोड परिसरात प्रचंड ट्राफिक जॅम झाले होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना चांगलीच दमछाक झाली. मानेवाडा-बेसा, म्हाळगीनगर, हुडकेश्वर पोलिस स्टेशन ते पिपळा, नारा, फ्रेन्डस कॉलनी आदी रस्त्त्यांवरील वस्त्यांमध्येही पाणी शिरले.

विमानतळाकडे जाणारा रस्ताही जॅम

वर्धा रोडवरून डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली होता. या ठिकाणी गुडघाभर पाणी जमा झाले होते. त्यामुळे पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. या रस्‍त्यावरील सर्व पाणी वर्धा मार्गावर आल्याने हॉटेल प्राईडजवळ वाहतूक कोंडी झाली.

घरे व अपार्टमेंट्समध्येही शिरले पाणी

मुसळधार पावसाचा फटका कमीअधिक प्रमाणात शहरातील सर्वच भागांना बसला. केवळ झोपडपट्ट्यांमध्येच नव्हे, अनेक घरे, अपार्टमेंट्स व बेसमेंटमध्येही पाणी शिरले आहे. उत्तर नागपुरातील बहुतांश वस्त्या बराच वेळपर्यंत पाण्यात होत्या. काही भागांत कंबरेपर्यंत पाणी तुंबल्याचे दिसून आले.

मनपा इमारतीच्या तळघरातही पाणी

पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या तळघरातही चांगलेच पाणी जमा झाले होते. कार्यालयात येताच कर्मचारी, अधिकाऱ्यांना पाणीच पाणी दिसले. पंपाद्वारे पाणी बाहेर काढण्यात आले. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांची वाहने आवारात ठेवावी लागली.

चोवीस तासांत ८३ मिलिमीटर

गेल्या चोवीस तासांत उपराजधानीत तब्बल ८३ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण १२४६ मिलिमीटर पाऊस झाला असून, आणखी पावसाचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यामुळे यावेळी गेल्या दशकातील पावसाचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.

विदर्भात आजही यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान विभागाने आणखी चोवीस तास नागपूरसह संपूर्ण विदर्भात अलर्ट दिल्याने मंगळवारीही मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. त्यानंतरही दोन-तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्यप्रदेशसह मध्य भारतावर सध्या तीव्र कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात वरुणराजाचा कहर सुरू आहे.

Web Title: Nagpur Heavy Rains Everywhere Waterlogged

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..