नागपूर : पावसाची तुफानी फटकेबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rains

नागपूर : पावसाची तुफानी फटकेबाजी

नागपूर : विदर्भात सक्रीय असलेल्या वरुणराजाने रविवारीही उपराजधानीत दमदार हजेरी लावली. दुपारी व सायंकाळच्या सुमारास शहरात सगळीकडेच मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे रस्ते जलमय होऊन चौकाचौकात पाणी तुंबले होते. अनेक ठिकाणी ट्राफिक जॅम झाल्याने नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे सिमेंट रस्ते व महापालिकेची पोलखोल झाली. हवामान विभागाचा विदर्भात रेड, ऑरेंज व यलो अलर्ट असल्याने सोमवारपासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

रविवारी पावसाने दिवसभर ब्रेक घेत आलेल्या जोरदार पावसाने रात्री चांगलेच धुमशान केले. यामुळे शहरातील अनेक सखल भाग व वस्त्यांमध्ये चांगलेच पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

त्रिमूर्तीनगर चौक व गार्डन परिसर, सरस्वती विहार कॉलनी,दीनदयाल नगर, पडोळे चौक, जयताळा चौक, अंबाझरी धरमपेठ कॉलेज परिसर, शंकरनगर चौक, खामला परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. त्यातच नव्याने बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसले. महापालिकेचा नियोजनशुन्य कारभार या जलसंचयास कारणीभूत असल्याचा सूर यावेळी लोकांमधून उमटत होता. पीकेवी कॉलेज विद्यार्थी वसतीगृह परिसराला या जोरदार पावसाचा फटका बसला. पश्‍चिम नागपूर वगळता इतरही भागांत व प्रमुख रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून लोकांना वाट काढावी लागल्याचे दिसले.

छत्तीसगड व आंध्रप्रदेशसह मध्य भारतावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. नागपुरात सलग चौथ्या दिवशी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह मेघराजाने दणक्यात बॅटिंग केली. दुपारी एकला सुरू झालेला पाऊस तीन-साडेतीनपर्यंत सुरूच होता. त्यानंतर सायंकाळीही अनेक भागांत तुफान पाऊस झाला. कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी साचल्याने ठिकठिकाणी ट्राफिक जॅम झाले. पावसामुळे अनेकांची वाहने बंद पडून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. खामला परिसरातील भांगे लॉन ते पडोळे हॉस्पिटलच्या रस्त्यावर तलाव साचल्याने एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. शहरात इतरही अशीच स्थिती होती. दुपारनंतर कमी अधिक प्रमाणात सरींवर सरी सुरू राहिल्याने नागपूरकरांना गेल्या आठवड्याप्रमाणे यावेळचा रविवारही घरातच काढावा लागला.

शहरात गेल्या काही दिवसांपासून नियमित पाऊस पडत असल्याने अनेक सखल वस्त्यांमध्ये विशेषतः झोपडपट्टी भागांत पाणी तुंबले आहे. याचा फटका येथील नागरिकांना बसला. विशेष म्हणजे पश्‍चिम नागपुरातील चांगल्या समजल्या जाणाऱ्या वस्त्यांची या पावसाने तुंबापुरी केली.

प्रादेशिक हवामान विभागातर्फे शहरात रात्री साडेआठपर्यंत ५५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात वर्धा (१०८.४ मिलिमीटर), चंद्रपूर (७२ मिलिमीटर), बुलडाणा (४८ मिलिमीटर), गडचिरोली (३७ मिलिमीटर), अकोला (२५.५ मिलिमीटर), यवतमाळ (२५ मिलिमीटर), वाशीम (१४ मिलिमीटर), अमरावती (१३.४ मिलिमीटर) येथेही चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. एकाचवेळी तीन अलर्ट असल्याने आगामी दोन-तीन दिवस विदर्भात आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांत सोमवारी रेड अलर्ट असून, नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अन्य जिल्ह्यांत यलो अलर्ट असल्यामुळे संपूर्ण विदर्भात जोरदार वरुणधारा बरसण्याची दाट शक्यता आहे.

शहरातील रस्ते झाले जलमय

रविवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. दीनदयालनगर, स्वावलंबीनगर, योगेश्वरनगर, दिघोरी, कळमना, सेंट्रल बाजार रोड रामदासपेठ, रहाटे कॉलनी चौक, त्रिमुर्तीनगरातील अनेक भाग, धरमपेठ चौक, रामदासपेठ, धरमपेठ कॉलेज, पडोळे चौक, एलआयजी कॉलनी व पायोनिअर सोसायटी त्रिमूर्तीनगर, दिघोरी, योगेश्वरनगर या भागांमध्ये पाणी तुंबले. वाहनचालकांना व नागरिकांना दोन फुट पाण्यामधून वाट काढावी लागली. अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यावरून पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरल्याचे सांगण्यात आले. सिमेंट रस्त्यावर पाणी साचल्याने महापालिकेच्या याबाबतचा नियोजनशुन्य कारभार उघड झाल्याचे चित्र दिसून आले.

तीन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक

विदर्भात सर्वत्र दमदार पाऊस सुरू असल्यामुळे पावसाचा बॅकलॉग भरून निघाला असून, वाशीमचा अपवाद वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे. गडचिरोली (अधिक २४ टक्के), चंद्रपूर (अधिक २३ टक्के) आणि वर्धा (अधिक २१ टक्के) या तीन जिल्ह्यांमध्ये तर सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे.

घरांमध्ये शिरले पाणी

सायंकाळी बरसलेल्या पावसामुळे अनेक वस्त्यातील घरात पाणी शिरले. रात्री दहाच्या सुमारास स्वावलंबीनगरातील नाला ओव्हर फ्लो झाल्याने परिसरातील घरात पाणी शिरले. दिघोरीतील योगेश्वरनगरातही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागे राहून काढावी लागली. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अशीच स्थिती होती.

Web Title: Nagpur Heavy Rains Hit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top