
Nagpur : होळीसाठी चार हजार पोलिस सज्ज
नागपूर : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सज्ज झाला असून रविवारी (ता.५) रात्रीपासून शहरातील ४० ठिकाणांवर पोलिस तैनात राहणार आहेत. त्यासाठी शहरात दोन दिवस चार हजारावर पोलिसांचा ताफा लावण्यात आला आहे.
होळी आणि धुलिवंदनाची शहरात चांगलीच धुम असते. दारूच्या नशेत हुल्लडबाजी करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून विविध कारवाया करण्यावर समाजकंटकांचा भर असतो. विशेष म्हणजे नागरिकांना शांततेत सण साजरा करता यावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मुख्य चौकात पोलिस नाकाबंदी मोहीम राबविणार आहे. शाळकरी मुला मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. या परिसरात पोलिस सलग गस्त करणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे,
होळीसाठी चार हजार पोलिस सज्ज
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी नाकेबंदी करण्यात आले आहे.
कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई
धुलिवंदनाच्या निमित्ताने पोलिसांनी हातभट्टी तसेच अवैधदारू विक्री करणारे, शस्त्रे बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून अनेकांना स्थानबद्धही करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार तपासण्यासाठी परिमंडळातील पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांचा समावेश असलेले पथक तयार करण्यात आले आहेत.
९१५ ठिकाणी होळी पेटणार
होळी सणाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी होलिका दहन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार शहरातील ९१५ जागी होलिका दहन करण्यात येईल. याशिवाय सोसायटी, विविध वस्त्यांमध्येही होलिका दहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.