
गृहमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला ‘पीडब्ल्यूडी’चा लाल कंदील
नागपूर : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना नागपूर येथून गडचिरोलीला हेलिकॉप्टरने जायचे होते. मात्र बांधकाम विभागाने रामगिरीवरून उड्डाणास परवानगी नाकारल्याने त्यांच्या दौऱ्यात रात्री उशिरा बदल करण्यात आल्याचे समजते. बांधकाम विभागाच्या नव्या निकषानुसार हेलिपॅड सभोवतालचा २४३ मीटर परिसर मोकळा पाहिजे. तो येथे नसल्याने परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा जाणार होते.
गृहमंत्री पोलिस विभागाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारला नागपूरला येत आहेत. त्यानंतर ते गडचिरोलीला जाणार आहेत. तेथील कार्यक्रम आटोपून लगेच नागपूरला परत येणार होते. याकरिता हेलिकॉप्टर सोयीचे होते. गृहमंत्री वळसे- पाटलांसाठी रविभवनचे कॉटेज क्रमांक ६ राखीव ठेवण्यात आले. रामगिरी येथे हेलिपॅडची व्यवस्था आहेच. येथूनच ते गडचिरोलीला रवाना होणार होते. तसा अधिकृत दौरा निश्चित करण्यात आला होता.
त्यासाठी पोलिस विभागाकडून बांधकाम विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आला. परंतु, बांधकाम विभागाने येथून हेलिकॉप्टर उडविण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे पोलिस विभाग व प्रशासनामध्ये मोठा खळबळ उडाली. बांधकाम विभागाकडून यासाठी तांत्रिक कारण पुढे करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वीही येथून हेलिकॉप्टर उडाले आहे. त्यामुळे आताच नाकारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. बांधकाम विभागाच्या नव्या निकषानुसार हेलिपॅड सभोवतालचा २४३ मीटर परिसर मोकळा पाहिजे. या नियमामुळे गृहमंत्र्यांना नागपूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने गडचिरोलीला जावे लागणार आहे.