Nagpur: चिमुकल्यासाठी गणेशजी ठरले देवदूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यासाठी गणेशजी ठरले देवदूत

नागपूर : चिमुकल्यासाठी गणेशजी ठरले देवदूत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डॉक्‍टर साहाब...डागा रुग्णालयातून डॉक्‍टरांनी मेडिकलमध्ये पाठवलं... मेरे बच्चे को बचाओ ... तुमचे उपकार होतील... व्हेंटिलेटर लगाओ साहाब... अशी विनवणी नवजात शिशूचे माता-पिता करीत होते. मेडिकलमधील डॉक्टर मात्र, आम्ही बाळाला व्हेंटिलेटर लावू शकत नाही, अतिदक्षता विभागात ठेवू शकत नाही असे सांगताना बाळाला काही झाले तर आम्ही जबाबदार नाही, असे थेट सुनावत होते. हे दृश्‍य बघून उपस्थितांचे हृदय हेलवाले. एवढ्यात एक अनोळखी व्यक्ती धावून आली. त्यांनी शिशूला खासगी रुग्णालयात दाखल केले. एवढेच नव्हे तर बाळाच्या उपचाराचे ९० हजार रूपचे बिलही भरले. गणेश चाचेरकर असे या देवदूताचे नाव.

मेडिकलच्या आपत्कालीन विभागात २८ ऑक्टोंबरला मेडिकलच्या प्रवेशद्वारावर आपल्या चिमुकल्या बाळाला छातीशी कवटाळून डॉक्टरला उपचार करण्यासाठी विनंती करणारी माता दिसली. सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे यांनी बाळाला भरती करण्याची विनंती केली. मात्र, नियमांवर बोट ठेवत डॉक्‍टरांनी त्या माता-पित्याच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले. माणुसकी संपली असल्याचा आरोप डॉक्टरांवर केला.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

मात्र, १८ दिवसांच्या बाळाचा मृत्यू होऊ नये म्हणून पालकांना धीर देत अनिकेत यांनी ही बाब गणेश चाचेरकर यांना सांगितली. चाचेरकर अवघ्या सातच मिनिटात मेडिकलमध्ये पोहचले. तासभरापासून आसवे गाळत असलेल्या त्या मातापित्यांना धीर दिला. चाचेरकर यांनी त्वरित बाळाला खासगी रुग्णालयात मातापित्यांसह पाठवले. चिमुकल्यावर तब्बल १५ दिवस उपचार झाले. तेथील डॉक्टरांनी ९० हजार रुपये खर्चाचे बिल चाचेरकर यांच्या हाती दिले. चाचेरकर यांनी संपूर्ण बील अदा केला. आज गुरूवारी (ता.११) बाळाला सुटी दिली.

घरी जाण्यापूर्वी त्या ‘देवदूता’चे आभार..

३१ दिवसांच्या त्या बाळाला खासगी रुग्णालयातून सुटी झाली. मात्यापित्याने घरी नेण्यापूर्वी बाळाला जीवदान देणाऱ्या त्या देवदूताचे दर्शन घेतले. गणेश चाचेरकर यांनीही बाळाला जवळ घेतले. बाळाचे वडील वाजीद शेख यांनी मदतीसाठी धावून आलेले गणेश चाचेरकर तसेच अनिकेत कुत्तरमारे या दोघांचेही आभार मानले.

loading image
go to top