esakal | अर्धी उपराजधानी होती अंधारात! बिघाड शोधण्यासाठी लागला दीड दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धी उपराजधानी होती अंधारात! बिघाड शोधण्यासाठी लागला दीड दिवस

अर्धी उपराजधानी होती अंधारात! बिघाड शोधण्यासाठी लागला दीड दिवस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ऊर्जामंत्री व पालकमंत्री नितीन राऊत यांच्या शहरात असलेल्या पूर्व व दक्षिण नागपूरमधील काही वस्त्यांना तब्बल १८ तास विजेविना राहावे लागले. एवढेच नव्हे तर मंगळवारची रात्र अंधारात व पंख्याशिवाय काढावी लागली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे उकाडा यामुळे या परिसरातील नागरिक चांगलेच हैराण झाले होते.

मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जुना नंदनवन, गणेशनगर, जुनी शुक्रवारी, शिवनगर, गंगाबाई घाट आदी परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. घरांसोबत पथदिवेसुद्धा बंद पडल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. पाऊस असल्यामुळे तो खंडित करण्यात आला असावा असेच सर्वांना वाटत होते. मात्र, रात्री बारा वाजेपर्यंतही वीज येत नसल्याने नागरिक असह्य झाले होते. अनेकांनी महावितरणच्या कार्यालयात विचारणा केली. मात्र, कशामुळे वीज पुरवठा खंडित झाला याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. यामुळे अनेकांना रात्र जागून काढावी लागली. सकाळपर्यंत वीज आली नव्हती.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

वीज प्रवाह खंडित झाल्याच्या तक्रारीमुळे महावितरणचे कर्मचारी कामाला लागले. नेमका प्रवाह कुठून खंडित झाला हे कोणालाच कळत नव्हते. शेवटी भूमिगत वाहिनीमध्ये अडचण असल्याचे समजले. ती खोदून काढण्यात आली. ती दुरुस्त करेपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. अद्ययावत व अत्याधुनिक यंत्रणा असल्याचा दावा करणाऱ्या महावितरणला एक बिघाड शोधून काढण्यासाठी तब्बल १८ तास लागले. भर उन्हाळ्यात जर असे प्रकार झाले तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.

भूमिगत केबल्स यंत्रणेचे तोटे उघड

शहरात प्रत्येक वस्तीत आता उंच इमारती उभ्या राहत आहेत. अशावेळी खांबावरील वीजपुरवठा यंत्रणा धोकादायक असल्याचे सांगत भूमिगत केबल्स टाकले जात आहेत. शहराच्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. असे असले तरी भूमिगत केबल यंत्रणेमुळे बिघाड कुठे झाला हे शोधणे अत्यंत कठीण आणि वेळ घेणारे आहे हे कालच्या घटनेवरून उघड झाले. बिघाड शोधण्यासाठीच तब्बल दीड दिवस लागला.

loading image
go to top