
नागपूर : अक्षय तृतीयेच्या पूजेवर 'महागाईचे' सावट
नागपूर : पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणानिमित्ताने पुजेसाठी लागणाऱ्या माठ, वाळा आणि पळसाच्या पानाच्या पत्रावळीच्या दरातही २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेची पूजाही महागली आहे.
लाल माठ, वाळा आणि पळसाच्या पानाच्या पत्रावळी पूजेसाठी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने अक्षय तृतीयेसाठी लागणारे साहित्य बाजारात आले आहे. मात्र, कोरोनाच्या काळात अनेक परंपरागत कुंभार मरण पावल्याने मातीच्या माठांचे उत्पादन कमी झालेले आहे. मात्र, त्यात मागणी वाढल्याने दरात तब्बल ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. याशिवाय हिरव्या वाळ्यालाही विशेष महत्त्व आहे. ठोक बाजारात पूर्वी ६० ते ७० रुपये किलो मिळणारा वाळा आता १४० रुपये किलोवर गेला आहे. तर पळसाच्या पानाच्या पत्रावळीही प्रती नग दहा रुपये तर द्रोण पाच रुपये नग या दराने विकल्या जात आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या पूजेवरही महागाईची वक्रदृष्टी पडली आहे.
पत्रावळी, द्रोण, लाल माठ आणि वाळा अक्षयतृतीयेच्या पूजेसाठी महत्त्वाचे साहित्य आहे. आजपासून अमावस्या सुरू झाल्याने पितरांना नैवेद्य दाखविण्यात येते. यावर्षी मात्र, या सर्वच साहित्यांच्या दरात वाढ झालेली आहे.
- ज्ञानेश्वर कायंदे, विक्रेता