
युवांनो, केवळ टिक टॉक, रिल्स हे करिअर नाही!
नागपूर : सध्या सर्वत्र टिक टॉक व रिल्सची धूम आहे. काहींना ते करिअर वाटू लागलं आहे. पण खरं सांगू का... टिक टॉक अन् रिल्स हे काही करिअर होऊ शकत नाही. अभिनयाची आवड असणाऱ्या युवा वर्गाने या क्षेत्रात जरूर यावे मात्र, त्यापूर्वी आपले शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. ते एकदा झाले की, तुमची पॅशन असलेल्या क्षेत्रात तुम्ही स्वतःला झोकून द्या, झटपट यश मिळत नसतं. त्यासाठी सुरुवातीला स्ट्रगल अन् पुढे करिअरमधील टप्पे पार करावेच लागतात, असं मत नागपूरकर अभिनेत्री शिवांगी देवरस हीने व्यक्त केलं. ‘सकाळ’ कार्यालयात आयोजित ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात ती बोलत होती.
शिवांगी प्रामुख्याने टेलिव्हिजनच्या दुनियेत चमकली आहे. ‘एक था राजा, एक थी रानी’ (झी टिव्ही), कसम (कलर्स) आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या ‘ब्रह्मराक्षस’ या मालिकेद्वारे तिने अभिनयाची चुणूक दाखविली. नुकताच तिने ‘निबंध’ या मराठी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून तो प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विदर्भातील तरुणाईला असलेल्या संधींबाबत ती म्हणाली की, आज केवळ एका प्रादेशिक भाषेपुरतं मर्यादित राहण्याचे दिवस संपलेत. हिंदीतील अभिनय क्षेत्रात मोठी संधी आहे. मेहनत करण्याची तयारी तर हवीच पण डेडिकेशन आणि पेशन्सही हवेत.
शिवांगीने बराचकाळ गप्पा मारल्या. तिचा प्रवास उलगडताना म्हणाली की, नागपुरातच माझं शिक्षण झालं. सुरुवातीपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड होती. अभिनय, नृत्य याकडे कल होता. पण थेट अभिनयाकडे वळण्यापूर्वी मी ‘एचआर’मध्ये एमबीए पूर्ण केलं. काही काळ नागपूर, मुंबई आणि पुणे येथे मार्केटिंगचा जॉबही केला. त्यातून माणसं कशी ओळखावीत हे उमजले. त्याचा उपयोग ग्लॅमरस दुनियेतील फसव्यांना ओळखण्यासाठी झाला. खरं तर इंडस्ट्री समजायला दोन-तीन वर्षे लागतात. सुदैवाने मला थेट एकता कपूरच्या सिरियल्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. अर्थात त्यासाठी माझे टॅलेन्ट कामी आलं.
हिंदी इंडस्ट्रीमध्ये वैदर्भीयांची संख्या अल्प आहे. तेथे पंजाब आणि उत्तर प्रदेशचा बोलबाला दिसतो. तेथे चांगल्या संधी आहेत. माझी मदत लागली तर ती मी नक्की सहकार्य करेन. पण सर्वकाही रेडिमेड मिळत नसतं याचंही भान हवं.
- शिवांगी देवरस, अभिनेत्री
Web Title: Nagpur Instagram Reels Not Career Education Necessary Shivangi Deoras
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..