esakal | Nagpur: दिव्या देशमुख बनली नागपूरची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुख

दिव्या देशमुख बनली नागपूरची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर

sakal_logo
By
नरेंद्र चोरे -सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा महिला ग्रॅण्डमास्टर (डब्ल्यूजीएम) किताब मिळविला आहे. बुडापेस्ट (हंगेरी) येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत दुसरा आंतरराष्ट्रीय नॉर्म मिळवून तिने हा बहुमान प्राप्त केला. महिला ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारी दिव्या ही विदर्भाची पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.

१५ वर्षीय दिव्याला ग्रॅण्डमास्टर किताब पूर्ण करण्यासाठी बुडापेस्ट येथील स्पर्धेत साडेचार गुणांची आवश्यकता होती. दिव्याने नऊपैकी पाच गुणांची कमाई करून ग्रॅण्डमास्टर किताबावर थाटात शिक्कामोर्तब केले. २३०५ येलो रेटिंग असलेल्या दिव्याने पहिला आंतरराष्ट्रीय नॉर्म दोन वर्षांपूर्वी एरोफ्लॉट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविला होता. बुद्धिबळातील ग्रॅण्डमास्टर पूर्ण करण्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय नॉर्म पूर्ण करणे आवश्यक असते. हा प्रतिष्ठेचा किताब मिळविणारी दिव्या विदर्भाची पहिली महिला, नागपूरची दुसरी व विदर्भातील एकूण तिसरी बुद्धिबळपटू आहे. यापूर्वी अमरावतीचा स्वप्नील धोपाडे व नागपूरच्याच रौनक साधवानीने ग्रॅण्डमास्टर किताब मिळविलेला आहे. कोरोनामुळे जवळपास दीड वर्षे आंतरराष्ट्रीय स्पर्धा न झाल्याने दिव्याला ग्रॅण्डमास्टर किताबासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली.

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलची विद्यार्थिनी व डॉ. जितेंद्र आणि डॉ. नम्रता देशमुख यांची कन्या असलेल्या दिव्याने आतापर्यंत २२ वेळा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २० सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ ब्रॉंझपदकांची कमाई केली. शिवाय 'ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन' व तीनवेळा आशियाई विजेती राहिली. गतवर्षी भारताला ऑलिम्पियाडमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात दिव्याचा सिंहाचा वाटा होता, हे उल्लेखनीय. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील चमकदार कामगिरीबद्दल राज्य सरकारने तिला तीन वर्षांपूर्वी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले होते.

‘दिव्याचे महिला ग्रॅण्डमास्टर बनण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. उशिरा का होईना तिची इच्छा पूर्ण झाली, याचा तिच्यासह आम्हालाही आनंद आहे. ग्रॅण्डमास्टर किताबासोबतच कोरोनानंतर बोर्डवर प्रत्यक्ष खेळायला मिळत असल्याचा तिला अधिक आनंद आहे. ’

- डॉ. नम्रता देशमुख, दिव्याची आई

loading image
go to top