Nagpur : प्रमोद मानमोडेंसह तिघांवर जुनी कामठीत गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nagpur : प्रमोद मानमोडेंसह तिघांवर जुनी कामठीत गुन्हा दाखल

नागपूर : जुनी कामठी पोलिसांनी निर्मल उज्ज्वल बॅंकेचे संस्थापक प्रमोद मानमोडे, कामठी बॅंकेचे माजी व्यवस्थापक सचिन प्रकाशराव बोंबले आणि शैलेश कोचनकर यांच्याविरुद्ध तीन लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत करुणा युवराज वासनिक (रा.कळमना रोड, जुनी कामठी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी परिसरातील रनाळा येथे राहणाऱ्या करुणा वासनिक यांचे वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेल्या पैशाचे फिक्स डिपॉझिट करण्याचा सल्ला सचिन बोंबले यांनी देत निर्मल बॅंकेत चांगले व्याज मिळणार असल्याचे सांगितले. त्यानुसार बॅंकेचे कर्मचारी शैलेश कोचनकर यांनी २०१८ मध्ये करुणा आणि त्यांच्या वडिलांचे बॅंकेत बचत खाते उघडून देत चेक बुक दिले.

त्यानंतर सचिन बोंबले याच्या माध्यमातून पाच लाखांची ‘एफडी’ काढून दिली. तसेच करुणा यांच्या खात्यात असलेल्या एक-एक लाख रुपयाच्या तीन ‘एफडी’ आणि पन्नास हजार याप्रमाणे एकूण ३ लाख ५० हजार रुपयाच्या ‘एफडी’ काढल्या. मात्र, या एफडीचे मुळ प्रमाणपत्र काम असल्याचे सांगून दिले नाही.

पैसे न मिळाल्याने त्यांनी सचिन बोंबले यांचेशी संपर्क केल्यावर त्यांना त्यांनी दोन धनादेश दिले. मात्र, तेही बाऊंस झाल्याने त्यांनी प्रमोद मानमोडे यांचेशी संपर्क साधला. त्यांनीही सचिन बोंबले यांची संपत्ती विकून प्रत्येक महिन्यात एक लाख देण्याचे आश्‍वासन दिले.

त्यानंतर सचिन बोंबले यांनी ६ लाखांची रक्कम खात्यात टाकली. मात्र, उर्वरित तीन लाख परत दिले नाहीत. त्यावरुन दिलेल्या तक्रारीनुसार जुनी कामठी पोलिसांनी चौकशी करीत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी दुजोरा याला दुजोरा दिला. यापूर्वी नंदनवन पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी २ कोटी ८० लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

खात्यावर उचलले कर्ज

दरम्यान त्यांनी दिलेल्या चेक बुकमधील दोन चेक नसल्याचे आढळून आले. यावेळी बॅंकेच्या कामाने ते घेतले असल्याची माहिती देण्यात आली. २०१८ मध्ये बॅंकेत घोटाळा झाल्याची बाब उघड होताच माहिती घेतली असता त्यांच्या खात्यावर साडेतीन आणि साडेचार लाखाचे कर्ज घेतल्याचे दिसून आले.