नागपूर : भीषण आगीत बांबू डेपो खाक; पेट्रोल पंपही पेटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Kalmana bamboo depot loss at fire

नागपूर : भीषण आगीत बांबू डेपो खाक; पेट्रोल पंपही पेटला

बल्लारपूर : कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या डेपोला रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमाराला आग लागली. आगीत हजारो टन बांबू जळून खाक झाला आहे. सध्या येथे आगीच्या उंच ज्वाळा दूरवरून नजरेला पडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या डेपोत बांबू आणि लाकडे होती. त्यामुळे आग त्वरित पसरली. या डेपोच्या काही अंतरावरच वनविभागाच्या वतीने जंगलातील पालापाचोळा जाळण्याचे काम सुरू होते. उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे पालापाचोळ्याची ठिगणी या डेपोपर्यंत पोहोचली आणि आग लागली, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर, मूल, भद्रावती, वरोरा येथील अग्निशमन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सध्या घटनास्थळी सर्व शासकीय अधिकारी, पोलिस आणि व्यवस्थापनाचे अधिकारी पोहोचले आहेत.

बल्लारपूर पेपरमिल (बिल्ट ग्राफिक्स पेपर प्रोडक्टस लिमिटेड बल्लारपूर) ही आशियातील सर्वांत मोठी कागद उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचा बांबू डेपो बल्लारपूर शहरापासून साधारणतः १० किमी अंतरावर कळमना येथे आहे. या ठिकाणी बांबू आणि लाकडांचा साठा केला जातो.

आवश्यकेतनुसार तो पेपरमिलकडे पाठविला जातो. याच डेपोला आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, डेपोतीतील हजारो टन बांबू आणि लाकूड जळून खाक झाला. डेपोत जवळपास ५४ हजार टन बांबू आणि लाकडांचा साठा होता. त्याची किमत कोट्यवधींच्या घरात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.

पेट्रोलपंप, कंपनीचे कार्यालय जळाले

बामणी-आष्टी मार्गाचे काम बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येथे या कंपनीचे कार्यालय आहे. रविवारी कळमना मार्गावर असलेल्या डेपोला लागलेल्या आगीत या कंपनीचे कार्यालय आणि त्यांची वाहने जळाली. याच मार्गावर फुलझेले यांचे पेट्रोलपंप आहे. तेही या आगीत जळाले. वृत्त लिहीपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

Web Title: Nagpur Kalmana Bamboo Depot Loss At Fire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top