नागपूर : ‘किंगमेकर’ काळाच्या पडद्याआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : ‘किंगमेकर’ काळाच्या पडद्याआड

नागपूर : ‘किंगमेकर’ काळाच्या पडद्याआड

नागपूर ः संत्रानगरीचे महापौरपद दोनदा भूषविणारे आणि महापालिकेत ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे सरदार अटलबहादूर सिंग यांचे आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निधन झाले. एकेकाळी महापालिकेसह नागपूरकरांच्या हृदयावर सत्ता गाजविणाऱ्या अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने शहराच्या राजकीय क्षीतिजावरील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. मृत्यूसमयी ते ७९ वर्षांचे होते.

गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. परंतु, भेटायला येणाऱ्यांशी हसतमुखाने गप्पांमध्ये रंगत होते. प्रकृती खालावल्याने त्यांना सदर येथील शांतीमोहन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातेवाईक सायंकाळपर्यंत शहरात पोहोचणार आहेत. त्यांच्यावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे माजी महापौर कुंदा विजयकर यांनी सांगितले.

अटलबहादूर सिंग यांची महापालिकेच्या राजकारणावर जबरदस्त पकड होती. ते १९७७-७८ तसेच १९९४-९५ असे दोनदा महापौर होते. त्यांनी ‘लोकमंच’ नावाने आघाडी स्थापन केली होती. ते खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’ होते. त्यांच्या मर्जीशिवाय त्याकाळात कुणीही महापौर होत नसे. २००४ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा माजीमंत्री विलास मुत्तेमवार यांनी पराभव केला होता. परंतु, दोन वर्षांनी २००६ मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकला. राजकारणासोबतच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावरही त्यांनी आपली छाप सोडली होती. त्यांनी पक्षीय राजकारणातील मतभिन्नता वेगळी ठेऊन प्रत्येकाशीच मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध जपले होते. त्यांना तीन वर्षांपूर्वी खासदार क्रीडा महोत्सवात क्रीडामहर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याशिवाय महापालिकेतर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.

त्याकाळी नागपूर महानगरपालिकेचे चार प्रमुख स्तंभ मानले जायचे. त्यात सिंग यांच्यासह नाना शामकुळे, हिंमतराव सरायकर आणि प्रभाकरराव दटके यांचा समावेश होता. शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम या चौकडीने केले. वेळेचे काटेकोर पालन करणारे म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच मोठ्या नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. २०१४ च्या शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. विदर्भ महिला क्रिकेट, विदर्भ महाराष्ट्र हँडबॉल, विदर्भ हॉकी, विदर्भ फुटबॉल, नागपूर फुटबॉल आदी क्रीडा संघटनेचे पदाधिकारीही होते. क्रीडापटुंवर पुरस्कारांचा वर्षाव करणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक व मार्गदर्शक अशी त्यांची ख्याती होती.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

शहरवासींच्या सदैव पाठीशी

अटलबहादूर सिंग १९९४ मध्ये दुसऱ्यांदा महापौर झाले. त्याच वर्षी नागपूर शहराला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यात १० ते १२ लोकांचा मृत्यू झाला होता. या परिस्थितीत सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे शहराचा खरा ‘सरदार’ म्हणून ते खंबीरपणे उभे राहीले. त्यांनी महापौर फंड तयार करून शहरातील सेवाभावी नागरिकांकडून निधी गोळा करून तो मृतांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दिला होता.

राजकीय प्रवास

  • १९६९-७४ : पहिल्यांदा नगरसेवक

  • १९७५ -८० : दुसऱ्यांदा नगरसेवक

  • १९८५-९० : तिसऱ्यांदा नगरसेवक

  • १९९२-९७ : चौथ्यांदा नगरसेवक

  • १९७४-७५ : उपमहापौर

  • १९७७-७८ : महापौर

  • १९९४-९५ : महापौर

  • २००४ : भाजपकडून लोकसभा निवडणूक (प्रतिस्पर्धी विलास मुत्तेमवार)

loading image
go to top