नागपूर : हरविलेल्या व्यक्तींना शोधा ‘ॲप’ वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Koyalwar Police Concept missing persons Find on app

नागपूर : हरविलेल्या व्यक्तींना शोधा ‘ॲप’ वर

नागपूर : एखादा व्यक्ती हरविला तर त्याची नोंद केवळ त्याच हद्दीतील पोलिस ठाण्यात होते. त्याच्या बेपत्ता होण्याची माहिती इतर पोलिस ठाण्याला पोहोचत नाही. ही माहिती देशातील सर्व पोलिस ठाण्याला व्हावी, यासाठी कळमना पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन कोयलवार यांनी पोलिस क्लब ऑफ इंडिया’ या नावाने एक ‘ॲप’ तयार केला. हा ॲप बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी देशातील सर्व पोलिस ठाण्याला जोडणारा ‘सेतू’ सारखा काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोयलवार यांना चार वर्षापूर्वीच ॲपची संकल्पना सुचली. त्यांनी प्रयत्न सुरू करत तंत्रज्ञांची मदत घेतली. यासाठी पगारातून खर्च केले. याला चार वर्षे लोटली. हा ॲप आता पूर्णपणे कार्यान्वित झाला असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनी त्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली. हा ॲप केवळ मनुष्य हरविल्याची तक्रार करण्यासाठीच नाही. गाडी, मोबाईल चोरीची माहिती देण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. कोयलवार यांनी देशातील २८ राज्य आणि ७ केंद्र शाशित प्रदेशात असलेल्या सर्व पोलिस ठाण्यांना यात जोडले आहे.

इतकेच नाही तर त्यांचा क्रमांकही येथे उपलब्ध होणार आहे. बेपत्ता व्यक्तीचा डेटा ॲपमध्ये अपलोड केल्यावर देशभरात अॅपचा वापर करणाऱ्यांना माहिती मिळेल. यासाठी जीपीएस व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे बेपत्ता व्यक्तीचे लोकेशन, व्हेरिफिकेशन सहज करता येईल. त्यांच्या घरच्यापर्यंत संबंधित पोलिस स्टेशनला याची माहिती तत्काळ मिळेल. वरिष्ठ अधिकारी व गृहखात्याने याची दखल घेऊन याला आणखी विस्तारित स्वरूप द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देशात बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

नॅशनल क्राईम रिकॉर्डनुसार, २०१६ मध्ये महिला व मुली १ लाख ७४ हजार बेपत्ता झाल्या. २०१८ मध्ये २ लाख २३ हजार तर २०१९ मध्ये ४ लाख २२ हजार असे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे.

पोलिस आयुक्तांनी केले कौतुक

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची कोयलवार यांनी भेट घेतली. ॲपची माहिती त्यांनी आयुक्तांना दिली. आयुक्तांनी त्यांच्या या कामाचे भरभरून कौतुक केले. देशातील पोलिसांना या ॲपची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेपत्ता झालेले ६० टक्के सापडतात. उर्वरित ४० टक्के सापडत नाही. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तींसाठी आपण काम करावे, असे सुचले. पगारातून जेवढे जमेल तेवढे खर्च करीत गेलो. आता याला पूर्ण स्वरूप प्राप्त झाले असून ॲप ॲक्टीव झाला आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- नितीन कोयलवार, सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: Nagpur Koyalwar Police Concept Missing Persons Find On App

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top