
नागपूर : तरी देखील ‘झाडीपट्टी’ उपेक्षितच
नागपूर : झाडीपट्टी रंगभूमीचा उल्लेख करताना मोठमोठ्या बाता केल्या जातात. दीडशे वर्षांचा इतिहास, परंपरा असे अनेक बिरुद या रंगभूमीबद्दल लावले जातात. व्यावसायिक स्तरावर मुंबईनंतर याच रंगभूमीचा क्रमांक लागतो, यात वाद नाही. मात्र, अद्यापही झाडीपट्टी रंगभूमी उपेक्षितच आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशा भावना झाडीपट्टी रंगभूमीवर लेखक, कलावंत म्हणून काम करणाऱ्या आसावरी नायडू यांनी ‘दै. सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.
महिला नाट्य लेखिकांपैकी एक
आसावरी नायडू यांच्या आई वत्सला पोलकमवार व वडील प्रभाकर अंबोणे नावाजलेले कलावंत. घरातूनच त्यांना कलेचा वारसा मिळाला. तर पती तुषार नायडू (ज्येष्ठ नाट्यकर्मी गणेश नायडू यांचे चिरंजीव) यांच्याशी विवाह झाल्यानंतर ही वाटचाल अधिक बहरत गेली. त्यांच्या झाडीपट्टी रंगभूमीवरील २० ते २२ वर्षांच्या काळात त्यांनी तीन हजारांवर प्रयोगांमधून झाडीपट्टी रंगभूमी गाजवली. यापैकी पंधरा ते वीस नाटकेदेखील लिहिली. आज या समृद्ध अशा या रंगभूमीसाठी संहिता लिहिणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या काही महिला लेखिका आहेत, त्यापैकी आसावरी या एक
अभ्यासपूर्ण चित्रपट काढावा
आसावरी नायडू यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर चित्रित करण्यात आलेल्या ‘झॉलिवूड’ चित्रपटाचे कथानक लिहिले. हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. झाडीपट्टीमधून खास करून विदर्भातून निर्मिती होणाऱ्या चित्रपटाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, विदर्भातील चित्रपटांच्या कथानकांमध्ये दम आहे. परंतु, अनेकदा अति उत्साहातून निर्मितीचा पूर्ण अभ्यास न करता चित्रपट साकारला जातो. यामुळे इतर प्रदेशात विदर्भातील निर्मितीवर शंका व्यक्त केली जाते. काही निर्माते, दिग्दर्शकांच्या अपूर्ण अभ्यासामुळे या क्षेत्रात विदर्भाची नकारात्मक प्रतिमा तयार होते.
आसावरी म्हणाल्या, झाडीपट्टी रंगभूमीचा मुख्य प्रेक्षक शेतकरी, कष्टकरी वर्गातील आहे. घनदाट जंगलामधून चार ते पाच किलोमीटर पायी वाट सर करीत ते नियोजित ठिकाण गाठतात. नि:शुल्क पासची अपेक्षा न करीत संपूर्ण कुटुंबाचे तिकीट काढून प्रयोग बघतात. इतर प्रेक्षक वर्गापेक्षा अधिक पटीने नाटक जगणारा हा वर्ग आहे. या वर्गामुळे कला व कलावंत समृद्ध होत आहे. हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय ही रंगभूमी दरवर्षी करते. मात्र, मोजक्या प्रेक्षक वर्गापुरतीच ही रंगभूमी सीमित असल्याने ‘झाडीपट्टी’ उपेक्षितच राहते.
हे रंगभूमीसह कलावंतांचे दुर्भाग्य आहे, अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
Web Title: Nagpur Lamented Film Production Vidarbha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..