
नागपूर : नासुप्रचा महामेट्रोवर कुरघोडीचा प्रयत्न
नागपूर - शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास व महामेट्रोमध्ये संघर्षाचे संकेत दिसून येत आहे. महामेट्रोने खर्चाचा तपशील विश्वस्त मंडळापुढे सादर करावा, असा ठराव आज नासुप्र विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला. नागपूर सुधार प्रन्यासने महामेट्रोला निधी दिला. परंतु खर्चाचा तपशील सादर करण्याबाबत पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला.
नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाची बैठक आज सदर येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत नासुप्रचे सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नासुप्र विश्वस्त आमदार विकास ठाकरे, नासुप्र विश्वस्त संदिप इटकेलवार तसेच नगर रचना विभागाच्या सहसंचालक व विश्वस्त सुप्रिया थूल उपस्थित होते. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. परंतु महामेट्रोला खर्चाचा तपशील पहिल्यांदाच मागण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सदनिका बदलून देणार
पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत पात्र १९ लाभार्थ्यांनी वरच्या मजल्यावरील सदनिका बदलून तळमजल्यावर देण्यासाठी अर्ज केले आहेत. हे सर्व लाभार्थी वयोवृद्ध, आजारी किंवा दिव्यांग आहे की नाही, याबाबत शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ज्यांना सदनिकेचा ताबा दिला आहे, त्यांचे अर्ज नामंजूर करून नव्याने ईश्वर-चिठ्ठीने सदनिका वाटप करण्याचा प्रस्तावही मंडळाने मंजूर केला.
डोके कुणाचे? डाव कुणाचा?
महामेट्रो शहरातील तिसऱ्या क्रमांकाचे विकास प्राधिकरण आहे. अर्थातच वार्षिक तपशीलही तयार केला जातो. राज्य सरकारकडेही दिला जातो. याबाबतची सर्व आकडेवारीही महामेट्रोकडे असते. परंतु गेल्या सात वर्षांच्या काळात प्रथमच महामेट्रोला नासुप्रने खर्चाचा तपशील मागण्याच्या निर्णयामागे नेमके डोके कुणाचे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याशिवाय विकासाची विविध कामांसाठी केलेल्या ७० कोटींचे तसेच ''मेट्रो रेल्वेसाठी अंशदान'' या शिर्षाअंतर्गत ३० कोटी रुपयांच्या तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यास मंजुरी देण्यात आली.
सात वर्षांनंतर प्रथमच असा निर्णय
महामेट्रोचे काम २०१५ पासून सुरू झाले. सात वर्षांच्या काळात नागपूर सुधार प्रन्यासने महामेट्रोला खर्चाचा तपशील मागितला नाही. मेट्रो रेल्वेचा आराखडा नागपूर सुधार प्रन्यासनेच तयार केला होता. ९ हजार कोटींच्या या प्रकल्पात नागपूर सुधार प्रन्यासने महामेट्रोला साडेचारशे कोटी रुपये द्यायचे होते. नागपूर सुधार प्रन्यास महामेट्रोला निधी देत आहे. नागपूर सुधार प्रन्यासने यंदा ३० कोटी रुपये दिल्याची नोंद आजच्या बैठकीत घेण्यात आली. परंतु सोबतच नासुप्रने आतापर्यंत दिलेल्या निधीचा तपशील नासुप्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत महामेट्रोने ठेवावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळात महामेट्रो व नासुप्रमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Web Title: Nagpur Mahametro Meeting Of Trustees Board
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..