
Nagpur : राज्यात MBBS प्रवेशाचे रॅकेट सक्रीय
नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असल्याची प्रकरणे समोर येत असतानाही पालक त्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात असे रॅकेट सक्रीय असून सदर पोलिस ठाण्यात मध्यप्रदेशातील व्यक्तीविरोधात अशाचप्रकारे प्रवेशातून ७० लाखांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
सौरभ कुमार गुप्ता (मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव असून शुभा काकडे असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या मुलीला वैद्यकीय प्रवेशासाठी एका व्यक्तीकडून
फोन आला. यावेळी त्यांनी
त्यांना हव्या त्या महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्यात येईल असे सांगण्यात आले.
राज्यात एमबीबीएस प्रवेशाचे रॅकेट सक्रीय
त्यावरून त्यांनी उज्जैन येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा असल्याचे सांगितले. त्यानुसार ७० लाख रुपयात प्रवेश मिळवून देण्याचे ठरले. त्यातून महिलेने त्यांना आरटीजीएसच्या माध्यमातून ७० लाख रुपये दिले. दरम्यान त्यांच्या मुलीला उज्जैनऐवजी राजस्थान येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याची माहिती समोर आली.
दरम्यान आरोपीने दिलेल्या ७० लाखांपैकी ३५ लाख महाविद्यालयात देत, उर्वरित रकमेची फसवणूक केल्याचे तक्रार सदर पोलिसांकडे दिली. त्यातून पोलिसांनी सौरभ कुमार गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
अजनीमध्येही यापूर्वी दोन गुन्हे
सदरमध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, तीन महिन्यांपूर्वी अजनी पोलिस ठाण्यात अशाप्रकारे एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोट्यवधींनी दोन पालकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. त्यात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. दरम्यान अशाच प्रकारे संपूर्ण राज्यात प्रवेशासाठी रॅकेट सुरू असल्याचे दिसून येते.