Nagpur : मनसेच्या कार्यकारिणीत कोण येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS

Nagpur : मनसेच्या कार्यकारिणीत कोण येणार?

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याने नागपूरसह पूर्व विदर्भाची सूत्रे आपल्या हाती राहावी याकरिता काही पदाधिकारी चांगलेच सक्रिय झाले आहेत. राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये येऊन शहर आणि ग्रामीणची कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी मनसेचे सर्वच विभाग रिक्त केले. त्यामुळे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे.

राज ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला तेव्हापासूनच गडकरी समर्थकांची धाकधूक वाढली होती. तसे संकेत आधीच त्यांना मिळाले होते. नागपूर वगळता इतर जिल्ह्यातील कार्यकारिणीत यांनी फारसे फेरबदल केले नाहीत. त्यावरून गडकरी हेच टार्गेट होते असे दिसून येते. त्यांच्या विरोधात काही तक्रारी होत्या. त्याची गंभीर दखल घेण्यात आल्याचे समजते.

दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे नगराध्यक्ष राजू उंबरकर हे राज ठाकरे यांच्या संपूर्ण दौऱ्यात फारच सक्रिय होते. त्यांना पूर्व विदर्भ आपल्या ताब्यात हवा आहे. त्यासाठी नागपूर जिल्हा महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी आपली स्वतंत्र टीम तयार केली आहेत. शहराध्यक्ष व ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून पदाधिकाऱ्यांची नावेसुद्धा निश्चित केली आहेत.

रविभवन परिसरात राज ठाकरे यांच्या स्वागत फलकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांचे ब्रँडिंगसुद्धा केले. जिल्ह्यात आपल्या समर्थकांची वर्णी लागावी यासाठी त्यांनी पूर्ण फिल्डिंग लावली आहे. राज ठाकरे यांचे नागपूर आगमनापासून त्यांच्या मुक्कामापर्यंतची सर्व जबाबदारी त्यांनी उचलली होती. राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे त्यांचे समर्थकही जोशात होते. मनसेकडे असलेले मोजक्याच कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेता उंबरकरांचे समर्थक निश्‍चित कार्यकारिणीत दिसणार आहेत.

अनपेक्षित नाव येणार समोर

राज ठाकरे यांच्या आगमनापूर्वी त्यांचे तीन विश्वासू विदर्भात तळ ठोकून होते. कोण कामाचे, कोण बिनकामाचे याचा अदमास त्यांनी घेतला आहे. त्यांच्याच रिपोर्टवरून नागपूरची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. हे बघता मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी काही नावे अनपेक्षितपणे अध्यक्षपदासाठी पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा फटका उंबरकरांच्याही समर्थकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Nagpur Mns Raj Thackeray Vist Vidarbha Hemant Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..