Nagpur : मॉन्सूनने घेतला विदर्भातून निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain news

Nagpur : मॉन्सूनने घेतला विदर्भातून निरोप

नागपूर : जवळपास चार ते साडेचार महिने सक्रिय राहिलेल्या मॉन्सूनने अखेर विदर्भातून निरोप घेतला. मॉन्सूनने विदर्भातून माघार घेतल्याची अधिकृत घोषणा प्रादेशिक हवामान विभागातर्फे सोमवारी करण्यात आली.

हवामान विभागानुसार, १६ जूनला मॉन्सून विदर्भात दाखल झाला होता. जवळपास साडेचार महिन्यांच्या मुक्कामानंतर २३ ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने अधिकृत निरोप घेतला. गेल्या दशकाचा विचार केल्यास, मॉन्सून यंदा दुसऱ्यांदा उशिरा माघारी परतला आहे. यापूर्वी २०२० मध्ये २६ ऑक्टोबरला मॉन्सूनची विदर्भातून एक्झिट झाली होती.

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदा विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत एकूण १२२८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जो सरासरीच्या (९३७ मिलिमीटर) ३१ टक्के अधिक पाऊस आहे. २०१३ नंतर पहिल्यांदाच इतका पाऊस झालेला आहे.

नऊ वर्षांपूर्वी विदर्भात १३६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे यावर्षी सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात ६३१ मिलिमीटर इतका झाला. ऑक्टोबरमध्येही पावसाने वैदर्भीचा पिच्छा सोडला नाही. या महिन्यात आतापर्यंत १३९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. यंदा पुरेसा पाऊस झाल्याने बहुतांश धरणे तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे.

टॅग्स :NagpurrainMonsoon