नागपूर : वारंवार वीजपुरवठा खंडीत, नागरिकांचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur MSEB citizen face problem electricity supply scarcity

नागपूर : वारंवार वीजपुरवठा खंडीत, नागरिकांचा संताप

नागपूर : सातत्याने वेळी अवेळी वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक संतप्त झाले असून आज वेगवेगळ्या दोन उपकेंद्रांवर दोन माजी नगरसेवक धडकले. माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांनी हिवरीनगर उपकेंद्राच्या अधिकाऱ्याला इशारा दिला तर माजी नगरसेवक बंटी कुकडे यांनी वाठोडा उपकेंद्रातील टेबलवर बसून रात्रीपर्यंत ठाण मांडत हंगामा केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित भारनियमन सुरू असल्याचे चित्र आहे. पूर्व नागपुरातील अनेक परिसरात रात्री विजपुरवठा खंडीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना भर उन्हाळ्यात पंख्याशिवाय राहावे लागत आहे. परिणामी पूर्व नागपुरातील नागरिकांत संताप आहे.

माजी नगरसेवक बाल्या बोरकर यांनी आज हिवरीनगर येथील वीज उपकेंद्रावर नागरिकांसह धडक दिली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक हितेश जोशी व परिसरातील नागरिक होते. त्यांनी केंद्रातील कनिष्ठ अभियंता जैस्वाल यांना निवेदन दिले. वारंवार विद्युतपुरवठा खंडीत झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. पूर्व नागपुरातील अनेक भागात रात्री अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान विजपुरवठा खंडीत होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची संख्या वाढली.

परंतु महावितरणकडून या केंद्राची क्षमता वाढविली नाही. परिणामी ट्रान्सफार्मर वारंवार बंद होत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या उपकेंद्रावर वर्धमाननगर, तरोडी, बगडगंज या उपकेंद्रातून तात्पुरता वीजपुरवठा घेतला जातो. वाठोडा उपकेंद्रात माजी नगरसेवक बंटी कुकडे यांनी वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने संताप व्यक्त केला. त्यांनी येथील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांच्यासमवेत प्रशांत मानापुरे व शेकडो नागरिक होते. त्यांनी नागरिकांसोबत वीज उपकेंद्रातील टेबलवर बसून रात्रीपर्यंत ठाण मांडले.

तीव्र आंदोलनाचा इशारा

हिवरीनगर उपकेंद्राची क्षमता वाढवा किंवा आणखी एक उपकेंद्र सुरू करा, अशी मागणी बाल्या बोरकर यांनी केंद्रातील कनिष्ठ अभियंता जैस्वाल यांच्याकडे केली. आठवडाभरात वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. यावेळी सुरेंद्र समुद्रे, राजू आचार्य, राजू बोंदरे, मनोहर चिकटे, ललित आमगे आदी शेकडो नागरिक होते.

Web Title: Nagpur Mseb Citizen Face Problem Electricity Supply Scarcity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top