esakal | ५०० नको १५०० रुपये असेल तरच मृतदेह उचलतो, मरणानंतरही होतोय छळ

बोलून बातमी शोधा

dead
५०० नको १५०० रुपये असेल तरच मृतदेह उचलतो, मरणानंतरही होतोय छळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेचे काही भ्रष्ट कर्मचारी पैसे कमावण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णाला घाटावर अंत्यसंस्कारासाठी न्यायचे असेल तर त्यासाठीसुद्धा नातेवाइकांना दीड ते दोन हजार रुपयांची मागणी करीत असल्याचा अत्यंत किळसवाणा आणि अमानवीय प्रकार शहरात सुरू आहेत. मरणानंतरही छळ करणाऱ्या अशा राक्षसी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा कोण करणार हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

खासगी, शासकीय रुग्णालय किंवा घरीच कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर महापालिकेमार्फत अंत्यसंस्कार केले जातात. संसर्गाचा धोका असल्याने बाधित असलेल्या मृतदेहाला हात लावण्याची परवानगी नसते. अंत्यसंस्कारालाही मोजक्याच नातेवाइकांना घाटावर येण्याची परवानगी असते. रुग्णाचा फक्त चेहरा दाखवल्या जातो. त्याच्यावर मनपाचेच कर्मचारी अग्निसंस्कार करतात. घरी मृत पावलेल्या रुग्णाला अंत्यसंस्कारसाठी अनेक तास वाट बघावी लागते. रात्री अपरात्री केव्हाही त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. रोज मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या आणि कामाचा ताण लक्षात घेता यात काही वावगे नाही. मात्र, हीच संधी साधून काही कर्मचाऱ्यांना रुग्‍णांच्या नातेवाइकांना लुटण्याचा धंदा सुरू केला आहे.

सोमवारी क्वार्टर परिसरात एका व्यक्तीने कोरोनाग्रस्त मुलाच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले. पैसे जुळवण्यासाठी उसनवारी केली. पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने त्याला घरीच विलगीकरणात ठेवले. काही दिवसानंतर तो दगावला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात होते. अंत्यसंस्कारासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. त्यापैकी एकजण आधी आला. मुलावर लवकर अंत्यसंस्कार करायचे असल्यास दीड हजार द्यावे लागले असे सांगून वडिलांकडे पैशाची मागणी केली. डोळ्यात अश्रू असताना वडिलाने खिशातून पाचशे रुपये देऊ केले. ते घेण्यास संबंधित कर्मचाऱ्याने नकार दिला. दीड हजार रुपये देणार असाल तरच मृतदेह नेऊ असे सांगून तो निघून गेला. ही बाब परिसरातील नगरसेवकाच्या निदर्शनास आणून दिली. त्याने कर्मचाऱ्यास बजावल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

असहायतेचा घेतात फायदा -

कोरोनाने मृत्यू झालेले मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱ्यांची आहे. याचाच फायदा काही कर्मचारी घेत आहेत. 'तुमच्या नातेवाइकाचा नंबर लवकर लावतो', असे सांगून चक्क दीड ते दोन हजार रुपयांची मागणी केली जाते. पैसे दिल्याशिवाय मृतदेहाला हातही लावत नाही. काहीतरी कारण सांगून तासभरात येतो असे सांगून पुढे निघून जातात. दुसरा पर्याय नसल्याने नातेवाइकांनाही मुकाट्याने पैसे द्यावे लागतात. सर्वच दुःखात असल्याने कोणी तक्रार करीत नाही. यात मात्र गोरगरिबांची चांगलीच परवड होत आहे.