
व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव
नागपूर ः मेडिकलमध्ये केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच लस उपलब्ध असल्याचे सांगून पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या सामान्य व्यक्तींची बोळवण केली जाते. मात्र एखाद्यासाठी व्हीआयपीचा फोन आला की, त्यांना पहिला डोस दिला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा: परमबीर सिंग यांच्याविरोधात माझ्याकडे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे, पोलिस निरीक्षकाच्या 'लेटरबॉम्ब'मुळे खळबळ
लसीकरण मोहीम १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली. जिल्ह्यात सर्वत्र कोविशिल्ड लस दिली जात असताना केवळ मेडिकलमध्येच कोव्हॅक्सिन लस दिली जाते. आतापर्यंत मेडिकलमध्ये १४ ते १५ हजारांपेक्षा अधिक लोकांना कोव्हॅक्सिनचा डोस दिला गेला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या आतापर्यंत साडेपाच हजार आहे. आणखी ९ हजार व्यक्तींना दुसरा डोस द्यायचा आहे. मात्र कोव्हॅक्सिन लसींचा अल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याने पहिला डोस देण्याच्या मोहिमेला थांबा लावला आहे.
मेडिकलमध्ये लसीकरणासाठी ज्येष्ठ व्यक्तींची संख्या अधिक आहे. दर दिवसाला दीडशेपेक्षा अधिक लोकं लसीचा कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मिळत नसल्याने परत जात आहेत. सद्या मेडिकलच्या लसीकरण केंद्रात ७०० लस उपलब्ध आहेत. यामुळेच पहिला डोस घेणाऱ्यांना नंतर या असे सांगण्यात येते. मात्र एखाद्या लोकप्रतिनिधी, अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींनी लसीकरणारे नियंत्रण करणाऱ्यांना फोन केला की, लगेच त्यांना पहिला डोस दिला जातो, असे उघडकीस आले आहे.
तीन ते चार फोन दररोज
दोन दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ व्यक्ती लसीकरणासाठी आले असता, त्यांना लसीकरणासाठी नंतर या, असे सांगण्यात आले. मात्र काही वेळ तेथेच थांबले. या दरम्यान एका व्हीआयपीचा फोन आल्यानंतर मात्र एका व्यक्तीला कोव्हॅक्सिनचा पहिला डोस लावण्यात आला. ही तक्रार एका व्यक्तीने केल्यानंतर यासदंर्भात अधिक माहिती घेण्यात आली. तेंव्हा दर दिवसाला किमान तीन ते चार व्हीआयपींचे फोन पहिल्या डोससाठी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा: शाळेचा गणवेश, पाठीवर बॅग घालून पोलिसांना दिसले युवक; बॅग उघडून बघताच सरकली पायाखालची जमीन
तशी डाटाएन्ट्रीमध्ये नोंद असल्याचेही सांगण्यात आले. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. विशेष असे की, काही दिवसांपूर्वी एका फोनमुळे मेडिकलमधील कोव्हॅक्सिन लस महापालिकेच्या महाल केंद्रात वळत्या करण्यात आल्या होत्या, हे विशेष.
संपादन - अथर्व महांकाळ
Web Title: Vaccination On Phone Of Vip Only Not For Common Man In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..