नागपूर : मॉन्सूनची चाहूल, नालेसफाई मात्र अपूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur municipal corporation Cleaning campaign

नागपूर : मॉन्सूनची चाहूल, नालेसफाई मात्र अपूर्ण

नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व नद्यांची स्वच्छता महापालिकेने सुरू केली. यंदा मॉन्सून लवकरच दाखल होणार असल्याने पावसाचीही चाहूल लागली. परंतु महापालिकेची नालेसफाई अद्यापही अपूर्ण आहे. शहराच्या काही भागात नालेसफाईची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सफाईनंतरही गाळ, कचरा कायम असल्याने नाले सफाईबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

महापालिकेने नालेसफाईची कामे सुरू करून महिना पूर्ण झाला. आता नद्यांची स्वच्छताही करण्यास सुरवात केली. आतापर्यंत नाल्याची सफाई झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु शहराच्या काही भागातील नाल्यातील स्वच्छता झाली. मात्र अजूनही काही भागात नालेसफाईला सुरवातही झाली नसल्याचे चित्र आहे. गंगाबाई घाटजवळील नाल्यात अजूनही गाळ कायम असून पाणी वाहून जात नाही. याशिवाय कचरा आहेच.

मॉन्सूनची चाहूल, नालेसफाई मात्र अपूर्ण

गंगाबाई घाट नाल्याला लागूनच भुतेश्वरनगर, शिवाजीनगर, नंदाजीनगर झोपडपट्ट्या आहेत. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी या वस्त्यांमध्ये शिरते. यंदा मॉन्सून लवकरच दाखल होणार असल्याच्या वृत्ताने येथील नागरिकांनी तत्काळ नाला सफाईची मागणी केली आहे. याशिवाय पश्चिम नागपुरातील डब्लूसीएलजवळील विकासनगरात काही दिवसांपूर्वी नाले सफाई केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. परंतु नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ कायम असल्याचे येथील नागरिकांनी नमुद केले. त्यामुळे महापालिकेकडून केवळ नालेसफाईची औपचारिकता पूर्ण केली जात असून पावसाळ्यात मोठ्या संकटांना नागरिकांना तोड द्यावे लागण्याची शक्यता आहे. शहरात २२७ नाले आहेत.

या नाल्यांची स्वच्छता केल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. नाले सफाईनंतर नद्यांचीही स्वच्छता सुरू करण्यात आली. परंतु गंगाबाई घाटजवळील नाला तसेच विकासनगरातील नाल्याने महापालिकेचा दावा फोल ठरवला आहे. काही प्रमाणात नाल्याचे स्वच्छता झाली. परंतु अजूनही अनेक भागातील नाल्यापर्यंत महापालिकेची यंत्रणा पोहोचली नाही.

शहरात नाग नदी १७.४ किमी, पिली नदी १६.४ आणि पोहरा नदीचे पात्र १३.१२ किमी लांब आहे. तिन्ही नद्यांचे एकूण ४६.९२ किमी पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत १३.६७ किमी क्षेत्र स्वच्छ झाले असून १७११६.८७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावाही महापालिकेने केला आहे.

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा पाहणी करण्याची गरज आहे. विकासनगरातील नाली सफाई केवळ औपचारिकता आहे. ही बाब गंभीर असून पावसाळ्यात येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. मनपाने पुन्हा एकदा सफाई करावी.

- अभिजित झा, नागपूर सिटीझन फोरम.

पावसाळी तयारी नसल्याचा आरोप

पालिकेने अद्यापही नाल्यांची साफसफाई केलेली नाही. शहरातील विहिरींची अजूनही स्वच्छता झालेली नाही. नदी-नाल्यांची स्वच्छता पूर्ण झालेली नाही. त्यामुळे येणारा पावसाळा शहरवासीयांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष पिंटू झलके यांनी व्यक्त केली.

Web Title: Nagpur Municipal Corporation Cleaning Campaign Nalas And Rivers In Before Monsoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top