Nagpur : भाजप जोमात, विरोधक कोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : भाजप जोमात, विरोधक कोमात

नागपूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्याने भारतीय जनता पक्षाने मरगळ झटकून महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयार सुरू केली. दुसरीकडे आघाडीत लढावे की एकत्र या संभ्रमात असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अजूनही कोमातच असल्याचे दिसून येत आहे.

भाजप वर्षभर निवडणुकीच्या मिशनवरच असतो. महापालिकेची निवडणूक केव्हाही घोषित होणार असल्याने पक्षस्तरावर आणि इच्छुकांमार्फत वैयक्तिक स्तरावर व भेटीगाठींचा कार्यक्रम राबविला जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच भव्यदिव्य उपक्रमांचा चांगलाच फायदा भाजपला होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शहरात सक्रिय झाले आहेत. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी बैठका आणि भेटीगाठी, उद्‍घाटनांचा सपाटा लावला आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर असलेली नाराजी दूर करण्यात दोन्ही नेत्यांना बरेच यश आले आहे. महापालिका निवडणूक लांबल्याचा फायदाही भाजपला होणार असल्याचे सद्यातरी दिसून येत आहे.

सत्ता बदलाने गणित बिघडले

महाविकास आघाडी सत्तेवर असताना महापालिकेतही सत्ताबदल होणार असे वाटत होते. तशी जनभावना तयार करण्यात यश येऊ लागले होते. त्यातच तीन सदस्यांच्या प्रभागाची रचनाही काँग्रेसला पोषक होती. काँग्रेसने केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात किमान ६० नगरसेवक जिंकून येतील असे आढळून आले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. राज्यातील सत्ताबदलानंतर तो आता मावळत चालल्याचे दिसून येते.

आघाडीने फायद्यापेक्षा नुकसानच अधिक

काँग्रेसची एक निश्चित व्होट बँक शहरात आहे. भाजपलाही ते नाकारता येत नाही. महाविकास आघाडीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. एकत्रित लढल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी किमान ५० जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे फायद्यापेक्षा भांडणेच वाढणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शहरात वाढू देणे काँग्रेससाठी धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांचा आघाडीला कडाडून विरोध आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत तर राष्ट्रवादी चिंतन बैठकीत व्यस्त आहे. शिवसेनेत नेमके काय सुरू आहे हे कोणालाच ठाऊक नाही.