नागपूर : मनपा निवडणुकीचा पुन्हा ‘लोचा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur municipal corporation

नागपूर : मनपा निवडणुकीचा पुन्हा ‘लोचा’

नागपूर - शिंदेसेना-भाजपच्या नव्या सरकारने महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय दोघांच्या कॅबिनेटने घेतल्याने पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीचा ‘लोचा’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता प्रभागाची रचना, सदस्यसंख्या तसेच तीन नगरसेवकांचा प्रभागाची रचनाही बदलणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच निवडणुकीसाठी डिसेंबर महिना उजाडणार असल्याचे दिसून येते.

महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्याच्या निवडणूक आयोगाने प्रभाग रचना, सदस्य संख्या निश्चित केली होती. एससी, एसटी, महिला तसेच ओबीसी आरक्षणाची सोडतही काढली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई आणि कोकण सोडून पावसाळ्यात निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.

आयोगाने केलेली तयारी बघता ऑगस्‍ट, सप्टेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र नव्या निर्णयामुळे सर्वच कार्यक्रम विस्कळित झाला आहे.

२०११च्या जनगणनेनुसार नागपूरची लोकसंख्या २४ लाख इतकी होती. याच लोकसंख्येचा आधार घेऊन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांची वाढीव सदस्यसंख्या कमी करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखलाही दिला होता.

प्रभाग चार सदस्यांचा होणार

२०११च्या जनगणनेचा आधार घेऊन २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतरच्या जनगणनेचा अहवाल व लोकसंख्येचा आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे २०१७ चीच प्रभाग रचना, सदस्य संख्या कायम ठेवून निवडणूक घेण्यात येईल असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुन्हा १५६ ऐवजी १५१ नगरसेवक

महाविकास आघाडी सरकारने संभाव्य लोकसंख्येचा आधार घेऊन नागपूर शहरात नगरसेवकांची संख्या पाचने वाढवली होती. ती आता घटणार आहे. त्यामुळे १५६ ऐवजी १५१ नगरसेवकांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी राहील, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Web Title: Nagpur Municipal Corporation Election Ward Structure Change Corporators Number Reduce

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..