
Nagpur News : महालातील भाजी बाजार केला रिकामा
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मालकीच्या महाल येथील बुधवार बाजाराच्या जागेवरील ३५६ परवानाधारकांवर कारवाई करीत त्यांचे दुकाने, ओटे तोडून जागा रिकामी करण्यात आली. या जागेवर नऊ मजली व्यावसायिक संकुल उभारले जाणार आहे. त्यात भाजी विक्रेत्यांनाही स्थान दिले जाणार आहे.
राजविलास सिनेमागृहाजवळचा भाजी बाजार फार जुना आहे. भोसले काळापासून येथे बाजार भरतो. माजी महापौर दयाशंकर तिवारी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना येथे व्यावसायिक संकुलासह अत्याधुनिक भाजी बाजाराची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यास काही भाजी विक्रेत्यांनी संमतीसुद्धा दिली होती. मात्र चार-पाच वर्षे हा प्रस्ताव पडून होता. विशेष म्हणजे याच भाजीबाजारासमोरून जाणारा केळीबाग रोडही प्रशस्त करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता.२५) उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, उपायुक्त (बाजार) रवींद्र भलावे आणि उपायुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. मनपाच्या बुधवार बाजार महाल येथील जागेवर नवीन नऊ मजली वाणिज्यिक संकुल बांधण्याचा निर्णय मनपा सभागृहाने घेतला. बुधवार बाजार महालमधील मनपा बाजार विभागाच्या परवान्यावर दुकान, ओटा, जागा वापरत असलेल्या ३५६ परवानाधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. याकरिता एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही दुकाने रिकामी केले जात नसल्याने आज शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात सकाळी ११ वाजतापासून अतिक्रमण विभागाच्या तीन चमूद्वारे बाजार खाली करण्यात आला.