
नागपूर मनपा स्टेशनरी घोटाळा | पाच जणांविरुद्ध दोषारोपपत्र
नागपूर : नागपूर महापालिकेतील ६७ लाखांच्या स्टेशनरी घोटाळ्यात आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध तब्बल १ हजार ८०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. याप्रकरणात आणखीही काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविला. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून पद्माकर (कोलबा) साकोरे (वय ५५ रा. जयप्रकाशनगर), सामान्य प्रशासन विभागाचे लिपिक मोहन रतन पडवंशी, अंकेक्षक मोहम्मद अफाक अहमद व मुख्य लेखाधिकारी राजेश मेश्राम यांना अटक केली होती.
चार विभागातही तीन कोटींचा घोटाळा
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असून, महापालिकेच्या चार विभागातही अशाचप्रकारे सुमारे तीन कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यात जन्म-मृत्यू, ग्रंथालय, आरोग्य व घनकचरा विभागाचा समावेश आहे. याप्रकरणात महापालिकेतील दोन बड्या अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई आहे. पोलिस त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे गोळा करीत असून, पुरावे हाती लागताच या अधिकाऱ्यांना अटक करण्यात येईल.
Web Title: Nagpur Municipal Corporation Stationery Scam Crime Filed Against Five Accused
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..