esakal | उदरनिर्वाहासाठी दिलेले मदर डेअरीचे आउटलेट भाड्याने, महापालिका घेणार झाडाझडती
sakal

बोलून बातमी शोधा

mother dairy

उदरनिर्वाहासाठी दिलेले मदर डेअरीचे आउटलेट भाड्याने, NMCकडून झाडाझडती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माजी सैनिक आणि अपंग यांना उदरनिर्वाह करणे सुलभ व्हावे या हेतूने चालवायला दिलेल्या मदर डेअरीचे काही आउटलेट (mother dairy outlet) भाड्याने दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेण्यात आली असून याची झाडाझडती घेण्याचा निर्णय महापालिकेने (nagpur municipal corporation) घेतला आहे. (nagpur municipal corporation will do inquiry of mother dairy)

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

अपंगांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने फक्त एक रुपयांच्या लिजवर मदर डेअरीसाठी मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. मदर डेअरीचे वाटप करताना माजी सैनिकांनासुद्धा प्राधान्य देण्यात आले होते. अशा एकूण ६९ डेअरी वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र काही बहाद्दरांनी त्या भाड्याने दिल्याचे उघडकीस आले आहे. काही नगरसेवकांनी याची तक्रार महापालिका आयुक्त आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे केली होती. त्यामुळे आगामी महापालिकेच्या सभेत हा विषय पटलावर ठेवला जाणार आहे. या माध्यमातून किती अपंग आणि माजी सैनिक खरोखरच मदर डेअरी चालवतात आणि किती लोकांनी भाड्याने दिली याची माहिती उघडकीस येणार आहे.

शहरातील काही फुटपाथ, मैदाने व उद्यानांच्या जवळ मदर डेअरीला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मदर डेअरी ब्रॅण्ड असल्याने ग्राहकही चांगले आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मदर डेअरी सुरू करण्यात आली. अनेक अपंगांना यामुळे रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. मात्र अलीकडे यातही व्यावसायिक वृत्ती बोकाळली आहे. कुठलेही काम न करता पैसे मिळवण्यासाठी काही डेअरीच भाड्याने दिली आहे. काही व्यावसायिकांनीच चांगली ऑफर दिल्याने ती भाड्याने देण्याचा मोह माजी सैनिक व अपंगांना टाळता आला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे महापालिकेने अधिकृत लीजवर जागा दिली असल्याने अतिक्रमण पथकापासूनही त्यास संरक्षण मिळत आहे.

व्यावसायिकांची घुसखोरी -

बेरोजगार अपंगांना मानवीय दृष्टिकोनातून मदर डेअरीचे स्टॉल वाटप करण्यात आले होते. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटावा हा त्या मागचा उद्देश होता. काही दिव्यांग प्रामाणिकपणे व्यवसायसुद्धा करीत आहेत. मात्र त्यांच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन काही व्यावसायिकांनी यात घुसखोरी केली आहे. अपंगांची कोंडी करून स्टॉल त्यांना भाड्याने देण्यास बाध्य केल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. मध्यंतरी ८० हजार रुपये घेऊन अपंगांना स्टॉल वितरित करण्याचे एक रॅकेटही उघडकीस आले होते.

loading image