
नागपूर : पत्नीशी वाद घातल्याने गुंडाने तरुणाला भोसकले
नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागातून एका कुख्यात गुंडाने साथीदारासह मिळून तरुणाला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे.
बंटी ठवरे (४०) रा. सेवादलनगर आणि चेतन मल्लेवार (३५) रा. बापूनगर अशी आरोपींची नावे आहेत. जखमी शुभम दिलीप सातपैसे (२९) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी शुभमची आई संगीता यांच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी शुभमचा काही कारणातून बंटीच्या पत्नीशी वाद झाला. शिवीगाळ झाल्यानंतर हे भांडण शमले. रात्री बंटी घरी पतरला असता पत्नीने भांडणाची माहिती दिली.
बंटीने मित्र चेतनला सोबत घेऊन शुभमचा शोध सुरू केला. रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास शुभम भांडे प्लॉट चौकातील एका पानठेल्यासमोर उभा आढळला. दोन्ही आरोपींनी त्याला घेरून मारहाण सुरू केली. याच दरम्यान बंटीने चाकू काढून शुभमच्या पोटात भोसकला. बंटी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच दोन्ही आरोपी फरार झाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. शुभमला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. बंटी आणि चेतनवर अनेक गुन्हे दाखल आहेत. एकेकाळी बंटीची परिसरात दहशत होती. पोलिसांनी त्याची लगाम कसण्यासाठी एमपीडीएही लावला होता.
Web Title: Nagpur Nandanvan Incident Murder In Arguing With His Wife One Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..