
नागपूर : मोजकेच कार्यकर्ते असणारी राष्ट्रवादी काँग्रेस शहरात अचानक आक्रमक झाली आहे. त्या तुलनेत काँग्रेस सौम्य झाली आहे. थेट गृहमंत्री अनिल देशमुख आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल दर आठवड्यात भेटीगाठी, सभा-संमेलने घेत असल्याने राष्ट्रवादीमध्ये उत्साह संचारला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेतही महाआघाडी कायम राहिल्यास जागा वाटप करताना काँग्रेसतर्फे दुय्यम स्थान मिळू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने एकत्रितच निवडणूक लढल्या आहेत. मात्र, काँग्रेसने पंधराच्यावर जागा दिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपाचा तिढा कायम ठेवला. आम्हालाच जागा कमी पडतात असे काँग्रेसचे म्हणणे होते.
मागील निवडणूक राष्ट्रवादीने स्वबळावर लढवली. त्यामुळे त्यांचा एकच नगरसेवक शिल्लक राहिला. चार वॉर्ड प्रभागाचाही त्यांना फटका बसला. काँग्रेसचेही यामुळे नुकसान झाले. दीडशे जागा जागा लढवून फक्त २८ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले. आता परिस्थिती बदलणार आहे. प्रभागाचा वॉर्ड होणार आहे. राष्ट्रवादीने किमान २० नगरसेवक निवडून येतील याचे नियोजन करणे सुरू केले आहे. त्यासाठी किमान ४० जागा सोडण्याची मागणी करावी लागणार आहे. राष्ट्रवादीने आक्रमक धोरणही स्वीकारले आहे.
अनिल देशमुख आणि प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादीच्या विस्ताराची जबाबदारी सोपविली आहे. दर आठवड्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. लग्नसमारंभापासून तर स्नेहभोजनालाही दोन्ही नेते हजेरी लावत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.
थेट बडे नेते आणि निर्णयाचे अधिकार असलेले नेतेच येत असल्याने प्रत्येकजण त्यांच्या पुढ्यात शक्तीप्रदर्शन करून आपल्या नावाची चर्चा घडवून आणत आहे. याशिवाय राष्ट्रवादीने सर्वांसाठी पक्षाची दारे उघडी केली आहेत.
दुसरीकडे काँग्रेस अद्यापही गटबाजीतून बाहेर पडायला तयार नाही. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष नसल्याने ‘आता आपली बारी’ असे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधकांना वाटत आहे. पालकमंत्री नितीन राऊत आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे यावेळी जागा वाटप करताना यावेळी आपल्याला प्राधन्य दिले जाईल, असेही ठाकरे विरोधकांचा तर्क आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.