Nagpur News : दोन कोटींचे काम ४५ लाखांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

Nagpur News : आमदार निवास कॅन्टीन दोन कोटींचे काम ४५ लाखांत

नागपूर : आमदार निवासातील कॅन्टीन जीर्ण झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डागडुजी केली जात आहे. याच्या वॉटर प्रुफिंगसाठी दोन कोटींच्या खर्चाचे इस्टिमेट तयार करण्यात आले. परंतु, हे काम आता अधिवेशनाच्या पूर्वी ४५ लाखांमध्ये होणार आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या जवळपास ७५ टक्के रकमेची बचत झाली. बांधकाम विभाग उधळपट्टीसाठी ओळखला जातो; परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत केल्याचे दिसते. आधी तयार केलेले इस्टिमेट आणि आताच्या इस्टिमेटमध्ये मोठी तफावत दिसते. परिणामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन संबंधित अभियंत्यांतील मोठे डिल फिस्कटल्याची चर्चा आहे.

हिवाळी अधिवेशन आले की, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (पीडब्ल्यूडी) कोट्य‍वधी रुपयांची कामे केली जातात. यात आमदार निवसाच्या रंगरंगोटीपासून तर मंत्र्यांचे निवासस्थान रविभवनाचा कायपालट केला जातो. लाखो रुपयांच्या नवनव्या वस्तू खरेदी केल्या जातात. फर्निचर बदलले जाते. चादरीपासून तर सोफ्याच्या कव्हरपर्यंत सर्वच नवीन आणले जाते.

दोन कोटींचे काम ४५ लाखांत

या खर्चावर कुणाचा अंकुश नसतो. सारेकाही पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मताने आणि मनाने होते. आमदार निवासमधील कॅन्टीनची दरवर्षीच डागडुजी व रंगरंगोटी केली जाते. प्रत्येक वेळी नवे काम काढले जाते. गरज असो वा नसे दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. अधिवेशन वगळता आमदार निवसाच्या कॅन्टीनमध्ये कोणी फारसे भटकत नाही.

आमदार निवासात राहायला येणारे एवढेच या कॅन्टीनचे ग्राहक असतात. यावेळी आमदार निवास कॅन्टीन दुरुस्तीसाठी प्रथम वॉटर प्रुफ करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवले होते. त्याकरिता दोन कोटींचे इस्टिमेट तयार केले होते. सारेकाही ठरले होते. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. अभियंत्यांचे टेबल बदलले. वॉटर प्रुफिंगच्या दोन कोटींच्या इस्टिमेटने आधीच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता वॉटर प्रुफिंगऐवजी फॉल सिलिंग व नवीन शेड टाकण्याचे ठरविण्यात आले. हे काम पंधरा दिवसांचे आहे. त्यासाठी ६० लाखांचे इस्टिमेट तयार करण्यात आले. ३० टक्के बिलात काम करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शवली. त्यामुळे हे काम आता ४० ते ४५ लाखात होणार आहे.

टॅग्स :NagpurworkerMLA