Nagpur : पाळीव श्वानाची नसबंदी करा,नोंदणी शुल्कात सवलत मिळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pets

Nagpur : पाळीव श्वानाची नसबंदी करा,नोंदणी शुल्कात सवलत मिळवा

नागपूर : महापालिकेने पाळीव श्वानांची नोंदणी करणे बंधनकारक केले असून आजपासून तीन महिन्यांत नोंदणी करण्याचे आदेश काढले आहे. नागरिकांना देशी श्वानांसाठी वार्षिक दोनशे तर विविध प्रजातींच्या श्वानांच्या नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. पण देशी श्वानाची नसबंदी केल्याचे प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत दिल्यास नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. विविध प्रजातींच्या श्वानांचे नसबंदीचे प्रमाणपत्र दिल्यास केवळ दोनशे रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात पाळीव श्वान आहेत. अनेकजण श्वानाला घाण करण्यासाठी बाहेर फिरण्यास नेताना दिसून येतात. ही घाण महापालिकेला स्वच्छ करावी लागते. त्यामुळे पाळीव श्वानांची नोंदणी व त्यांच्याकडून नोंदणी शुल्क घेण्याचा ठराव मागील आठवड्यात मंजूर करण्यात आला. त्यानुसार आज पाळीव श्वानांची नोंदणी करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी काढले.

आजपासून ९० दिवसांत अर्थात तीन महिन्यांत नागरिकांना त्यांच्याकडील श्वानांची नोंदणी करावी लागणार आहे. महापालिकेने देशी श्वान पाळण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता दोनशे रुपये तर इतर विविध विदेशी प्रजातींसाठी पाचशे रुपये वार्षिक नोंदणी शुल्क निश्चित केले आहे. विशेष म्हणजे एका कुटुंबाला जास्तीत जास्त तीन श्वानांची नोंदणी करता येणार आहे. त्यापेक्षा अधिक श्वानांसाठी महापालिकेची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.

नोंदणी करताना ॲंटी रेबीजचे नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. देशी श्वान पाळणाऱ्यांनी श्वानाची नसबंदी करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र सादर केल्यास दोनशे रुपये वार्षिक शुल्क माफ करण्यात येणार आहे. हीच अट विविध प्रजातीच्या विदेशी श्वानांसाठी असून त्यांना तीनशे रुपयांची सवलत देण्यात येणार असून केवळ दोनशे रुपये भरावे लागणार आहे.

नोंदणी करण्याचे टाळल्यास संबंधितांवर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड देशी तसेच विविध प्रजातीच्या विदेशी श्वान पाळणाऱ्या मालकांवरही आकारण्यात येईल.

झोन कार्यालयात नोंदणी

महापालिकेच्या दहाही झोन कार्यालयात नागरिकांना मुख्य स्वच्छता अधिकारी, विभागीय अधिकाऱ्यांकडे नोंदणी करता येणार आहे. श्वानांच्या तक्रारीही नागरिकांना याच कार्यालयात मुख्य स्वच्छता अधिकारी, विभागीय अधिकाऱ्यांशिवाय सहायक आयुक्तांकडे करता येणार आहे.

बोगस प्रमाणपत्र दिल्यास पशुवैद्यकावर २० हजारांचा दंड

नसबंदी केल्याने मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या श्वान मालकांस २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या पशुवैद्यकावरही २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

मुदतीनंतर नोंदणी केल्यास पाच रुपये प्रतिदिन दंड

महापालिकेने आजपासून तीन महिन्यांत नोंदणी करण्याचे आदेश काढले आहे. मुदतीनंतर नोंदणी केल्यास महापालिका पाच रुपये प्रतिदिन दंड आकारणार आहे. श्वान नोंदणी प्रमाणपत्राचा कालावधी १ एप्रिल ते ३१ मार्च असा राहणार आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये नोंदणी करावी लागणार आहे.

टॅग्स :Nagpurpetpet animals