Nagpur : नायलॉन मांजा मुलांच्या ‘गळ्या’शी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nylon manja

Nagpur : नायलॉन मांजा मुलांच्या ‘गळ्या’शी

नागपूर : नायलॉन मांजाने कालच एका मुलीचा गळा कापल्याची घटना ताजी असताना सोमवारी सांयकाळच्या सुमारास यशोधरानगर येथील समर्पण रुग्णालयाजवळ १८ वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला. शहानवाच गयासुद्दीन मलिक असे मुलाचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारास तो सायकलवरुन जात असताना, अचानक नायलॉन मांजाने तो जखमी झाला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर दुसरीकडे नायलॉन मांजामुळे चक्क मेट्रो ट्रेन थांबवावी लागली.

नायलॉन मांजाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रशासनाचे कान टोचल्यानंतर नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुद्ध कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसापासून या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. नागपूर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी शनिवारी आठ जणांना अटक केली आहे. अनेक वर्षापासून नायलॉन मांजाने पतंग उडविण्यास आणि विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी येत आहे. त्याची विक्रीही होत आहे. परंतु, शहरात मांजा विक्रीवर बंदी असताना शहरात तो येतोच कसा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केल्या जात आहे.

सक्रांत आली की फक्त कारवाई केली जाते. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, उत्पादकांना नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात यावी. तेव्हाच हा मांजा शहरात येणे बंद होईल. आम्ही हा मांजा आणत नाही तरीही शहरात त्याची विक्री होत आहे.

विक्रेत्यांना दंड

नागपूर : धंतोली झोन अंतर्गत इंदिरानगर येथील पतंग दुकानातून २० प्लास्टिक पतंगे जप्त करून महापालिकेच्या पथकाने सोमवारी १००० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उपद्रव शोध पथकाने पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

नायलॉन मांजाच्या विरोधात ९८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोन अंतर्गत इंदिरानगर येथील पतंग दुकानातून २० प्लास्टिक पतंगा जप्त करून १००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाने एका दुकानात छापा टाकला त्यात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. एक किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

नायलॉन मांजा मुलांच्या गळ्याशी

उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टिमकी, मोमीनपुरा येथील गणपती सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला.

धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.१३, अभ्यंकर नगर येथील मे. ग्रीन सेरिनिटी विरुद्ध रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवल्याबद्दल दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न. ३५, श्रीनगर येथील नारायणी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच बस स्टॅन्ड जवळ, राहुल कॉम्प्लेक्स, गणेशपेठ येथील ईनहान्स कोचिंग क्लासेस यांच्याविरुध्द परवानगीशिवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून पाच ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशीनगर झोन अंतर्गत प्रभाग न.२, पॉवर ग्रीड चौक येथील एसआयपी ॲबॅकस विरुद्ध परवानगीशिवाय विद्युत खांबावर बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

पँटोग्राफमध्ये मांजा अडकल्याने थांबली मेट्रो

राज्यात नायलॉन मांज्या वापरण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उपराजधानीत नायलॉन मांजाचा वापर सतत वाढत असून त्याचा फटका आता मेट्रोला बसला आहे. लोकमान्यनगर मेट्रो स्थानकात नायलॉन मांजा पँटोग्राफमध्ये अडकल्याने सीताबर्डी-हिंगणा मार्गादरम्यान धावणारी मेट्रो ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांनी व्हिडीओ बनवून ही घटना समोर आणली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकाराबद्दल पोलीस प्रशासनावर सर्वस्तरातून टीका होऊ लागली आहे.