Nagpur : महाविकास आघाडीमुळे रेल्वे प्रकल्पात अडथळे ; उपमुख्यमंत्री फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rail

Nagpur : महाविकास आघाडीमुळे रेल्वे प्रकल्पात अडथळे ; उपमुख्यमंत्री फडणवीस

अकोला : अकोला- खांडवा हा मार्ग दक्षिण-पश्चिम रेल्वेला जोडणारा मार्ग असून, महाविकास आघाडीने अडथळा निर्माण केल्याने हा प्रकल्प मार्गी लागला नाही. राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांना अडीच वर्षात उद्धव ठाकरे सरकारने खोळंबा घातल्याने कामे होऊ शकले नाहीत; परंतु आता महाराष्ट्रातील व विदर्भातील रेल्वे प्रकल्पांना गती देऊन रोजगार, पर्यटन व सुविधा उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता. २३)अकोला-अकोट दरम्यान धावणाऱ्या आठ डब्ब्यांच्या रेल्वे गाडीला ऑनलाईन हरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.

अकोला - अकोट शटल रेल्वेचा फायदा शेतकरी, आदिवासी व अकोट, तेल्हारा परिसरातील नागरिकांना होईल. उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यासाठी महत्त्वाचा असलेला अकोट-अमला खुर्द रेल्वे मार्गाचे कामसुद्धा लवकर सुरू होईल. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील रेल्वे प्रकल्पांना मोदी सरकार व राज्य सरकार प्राथमिकता देईल, अशी ग्वाही आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही ऑनलाईन हजेरी लावली.

अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक सहावर उद्‍घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार डॉ. रणजित पाटील, अनुप धोत्रे, दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे डीआरएम उपेंद्रसिंह, अतिरिक्त डीआरएम मीना, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, नागेंद्रसिंह, माजी महापौर अर्चना मसने आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील व विदर्भातील रेल्वे प्रकल्पांना गती देऊन रोजगार, पर्यटन व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी ५० टक्के वाट राज्य सरकार उचलण्यास कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रास्ताविक आमदार सावरकर यांनी केले. संचालन विश्वनाथ पंड यांनी केले तर आभार मीना यांनी मानले.

प्रयागराज, राजस्थानसाठी गाडीची मागणी

आमदार रणधीर सावरकर यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या वतीने पुणे-अकोला, वाराणसी-अयोध्या-प्रयागराज आणि राजस्थानसाठी अकोल्यातून गाडी सुरू करण्याची मागणी प्रास्ताविकातूनकेली. गोव्याला जाणारी गाडी दररोज सुरू ठेवण्याची मागणीही त्यांनी केली. दक्षिण-मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाचे डीआरएम उपेन्द्रसिंग यांनी ८५६ कोटी रुपये खर्च करून अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज व विद्युतीकरण झाल्याचे सांगितले. हा मार्ग अकोला, बुलढाणा व पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात रेल्वेची १६ हजार कोटीची कामे- दानवे

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या प्रसंगी बोतलाना सांगितले की, १६ हजार कोटी रुपयाची कामे महाराष्ट्राच्या विकासासाठी सुरू आहेत. त्यात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील व मेट्रो व बुलेट रेल्वेचे कामे शीघ्र गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील २०० स्थानकांचे नवीनीकरण करण्यात येत आहे. मूर्तिजापूर- अचलपूर-यवतमाळ या शकुंतला तसेच पुलगाव-आर्वी या दोन ब्रिटीश कालीन रेल्वे कंपनीच्या ताब्यात असलेल्या मार्गाचा विकास होऊ शकला नाही. रेल्वे विभागाने दोन्ही मार्ग ताब्यात घेण्याच्या दृष्टीने अंतिम नोटीस कंपनीला दिली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन या मार्गाच्या विकासाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

रेल्वे गाडीचे नवे वेळापत्रक

सकाळची फेरी

अकोला ते अकोट

अकोला ः स.७ वाजता

उगवा ः ७.११

गांधीस्मारक रोड ः ७.२२

पास्टुल ः ७.३८

अकोट ः ८.२०

परतीचा मार्ग

अकोट-अकोला

अकोट ः सकाळी ९ वाजता

पास्टुल ः ९.११

गांधीस्मारक ः ९.२७

उगवा ः ९.३८

अकोला ः १०.२०

सायंकाळची फेरी

अकोला ते अकोट

अकोला ः सा. ६ वाजता

उगवा ः ६.११

गांधीस्मारक रोड ः ६.२१

पास्टुल ः ६.३८

अकोट ः ७.२०

परतीचा मार्ग

अकोट-अकोला

अकोट ः रात्री ८ वाजता

पास्टुल ः ८.११

गांधीस्मारक ः ८.२७

उगवा ः ८.३८

अकोला ः रात्री ९.२०