Nagpur| विरोधकांचा सवाल : सावनेर, कळमेश्वरलाच निधी का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जि.प. सभा

नागपूर : विरोधकांचा सवाल : सावनेर, कळमेश्वरलाच निधी का?

नागपूर : दलित वस्ती निधी पशुंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या मतदारसंघातील दोनच तालुक्यांना का देण्यात आला, जिल्ह्यातील इतर तालुक्यांना का वगळण्यात आले या विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला काँग्रेसच्या सदस्यांनीसुद्धा पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेत एककलमी कारभारावर काँग्रेसमध्येही नाराजी असल्याचे उघड झाले.

उपाध्यक्षांची निवड करताना एकाच गटाला झुकते माप दिल्याने काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. ती जिल्हा परिषदेच्या सभेच्या माध्यमातून समोर आल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी मंत्री सुनील केदारांच्या मतदाराला लक्ष्य करून मांडलेल्या मुद्द्याला काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांनी पाठिंबा दर्शविला. दलित वस्त्यांसाठी येणारा निधी हा संपूर्ण जिल्ह्यासाठी असतो. जिल्ह्यात १३ तालुके असून या निधीचे नियोजन हे केवळ सावनेर आणि कळमेश्वर या दोनच तालुक्यांसाठी करण्यात आले. इतर ११ तालुक्यांवर अन्याय का केला? असा प्रश्न उमरे यांनी उपस्थित केला.

हे दोन्ही तालुके मंत्री केदार यांच्या मतदारसंघात येतात हे विशेष. हा मुद्दा चर्चेला येताच काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. अशात कंभाले यांनी ‘माईक’ हाती घेतल्यावर तेसुद्धा उमरेंना विरोध करणार असाच सगळ्यांचा समज होता. मात्र, समाजकल्याण अधिकाऱ्यांनी केवळ दोनच तालुक्यांसाठी हे नियोजन का केले? असा सवाल उपस्थित करून त्यांनी अधिकाऱ्यांवर तोफ डागली. भाजपच्या सदस्यांनीसुद्धा उमरेंसोबत कंभाले यांना समर्थन देऊन मंत्र्यांच्या एकाधिकारशाहीवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला.

कंभालेंची सारवासारव

दलित वस्त्यांच्या निधी वाटपावरून कंभालेंनी काँग्रेसला घरचा अहेर दिला. त्यानंतर बराचवेळ ते शांत बसले. नंतर त्यांनी जिल्हा परिषदेला विविध माध्यमातून निधी प्रदान करण्यासाठी केदार यांनी घेतलेल्या परिश्रमाबाबत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी सर्वच काँग्रेस सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले. असे करून कंभाले यांनी संतुलन साधल्याचे दिसून येते.

loading image
go to top