esakal | ६ लिटर पेट्रोलच्या पैशात महिनाभर अप-डाऊन, सामान्यांची मेट्रोला पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur-Metro

६ लिटर पेट्रोलच्या पैशात महिनाभर अप-डाऊन, सामान्यांची मेट्रोला पसंती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेट्रोलच्या वाढत्या किमतीने (petrol rate) सामान्य नागरिक, चाकरमान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे सहा लिटर पेट्रोलच्या पैशात महिनाभर मेट्रोतून (nagpur metro) अप-डाऊन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बर्डीवरून खापरी किंवा लोकमान्यनगरपर्यंत केवळ २० रुपयांत ये-जा करणे शक्य झाल्याने महागाईच्या काळात चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असून मेट्रो प्रवासाला नागरिकांची पसंती मिळत आहे. (nagpur people give preference to metro due to hike in petrol rate)

हेही वाचा: लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल

शहरात पेट्रोलचे दर १०७ रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. दररोजची गर्दी पाहता कमीत कमी पैशात कार्यालय व कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांनी आता मेट्रोवर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. मेट्रोतून बर्डी ते हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर तर वर्धा मार्गावरील बर्डी ते खापरी स्टेशनपर्यंत एका फेरीसाठी तिकिटाचे दर दहा रुपये आहे. कार्यालयातून परत घरी जाण्यासाठी पुन्हा दहा रुपयांचे तिकीट खरेदी केल्यास नागरिकांना अप-डाऊनसाठी केवळ २० रुपये खर्च येत आहे. अर्थात चाकरमान्यांना बर्डी ते लोकमान्यनगर, बर्डी ते खापरी स्टेशनपर्यंतचा महिन्याला केवळ सहाशे रुपये खर्च येत आहे. सध्याचे पेट्रोलचे दर बघता सहा लिटर इंधनाच्या पैशात नागरिकांना महिनाभर कार्यालय, कामाच्या ठिकाणी ये-जा करणे शक्य झाले आहे. परिणामी कोरोनामुळे इतर नागरिकांना मेट्रोतून फिरण्यास बंदी असली तरी मेट्रोच्या दोन्ही मार्गावर अत्यावश्यक सेवेतील चाकरमाने, नर्स आदींची गर्दी वाढली आहे. दररोज सकाळी तसेच सायंकाळी मेट्रोच्या दोन्ही मार्गावरील डब्यांमध्ये गर्दी वाढली आहे. दर फेरीनंतर मेट्रोच्या डब्याचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित प्रवासाचीही खात्री मिळत आहे. त्यामुळेही अनेकांनी ऑटो, शहर बसऐवजी मेट्रोचा पर्याय निवडल्याचे दिसून येत आहे.

मेट्रोचे तिकिट दर -

  • सीताबर्डी ते उज्ज्वलनगर : ५ रुपये

  • सीताबर्डी ते एयरपोर्ट व पुढे खापरीपर्यंत : १० रुपये

  • सीताबर्डी ते धरमपेठ कॉलेज : ५ रुपये

  • सीताबर्डी ते सुभाषनगर व पुढे लोकमान्यनगरपर्यंत : १० रुपये

स्टेशनवर ई-रिक्षा, ई-स्कूटर उपलब्ध -

मेट्रोतून प्रवासानंतर गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी मेट्रो स्थानकांवर १७ ई- रिक्षा आणि २२ ई- स्कूटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नीरी, सीआरपीएफ कॉलनी आणि लता मंगेशकर हॉस्पिटल येथे ई-स्कूटर उपलब्ध आहे. शहर बससेवा मेट्रो स्थानकांना शहरातील विविध भागांशी जोडली आहे.

मेट्रोचा प्रवास करताना नागरिकांना पैसेही बाळगण्याची गरज नाही. नागरिकांनी कॉमन मोबिलिटी कार्डचा उपयोग करावा. यासंदर्भात अडचण आल्यास स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना विचारणा करावी. महाकार्डचा वापर केल्यास प्रवासी भाड्यात १० टक्के सवलतही देण्यात येत आहे.
- डॉ. ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.
loading image