Nagpur : पंचनाम्यास गेलेल्या पोलिसाला उडविले भरधाव कारची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : पंचनाम्यास गेलेल्या पोलिसाला उडविले भरधाव कारची धडक

पारशिवनी : अपघाताच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला कारने जबर धडक दिली. या घटनेत पोलिसाचा मृत्यू झाला असून अन्य सात जण जखमी झाले. ही घटना बुधवारी नयाकुंड परिसरातील सुतगिरणीजवळ घडली. जयंत विष्णू शेरेकर (वय४२, रनाळा ,कामठी) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस कर्मचारी पारशिवनी पोलिस ठाण्यात कार्यरत होता.

चंद्रप्रकाश टेकाडे (वय ३२, नयाकुंड), अमोल कनोजे (वय ३०, पारशिवनी), विक्रमसिंग भैस (वय ४५, नयाकुंड), आकाश कोलांडे (वय२५, मेहंदी), संदीप तिजारे (वय ३५, मेहंदी), गौरव पणवेलकर (वय ३२), सागर सायरे (वय ३८, पारशिवनी) हे जखमी आहेत. जखमींना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पारशिवनीकडून आमडी फाट्याकडे जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याची माहिती पारशिवनी पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी जयंत शेरेकर व एक पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते गौरव पणवेलकर, अमोल कनोजे हे पोलिसांना मदत करण्याकरिता घटनास्थळी गेले. त्यांनी कारमध्ये अडकलेल्या जखमी विक्रमसिंग यांना बाहेर काढले.

त्यानंतर पोलिस कर्मचारी पंचनामा करू लागले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळित झाली होती. त्यामुळे पोलिस व गौरव पणवेलकर, अमोल कनोजे हे रस्त्यावरील ट्रॅफिक सुरळीत करीत असताना आमडी फाट्याकडून भरधाव कार (एमएच ४०, केएच ६३९३) घटनास्थळाकडे आली. या कारने काही कळायच्या आत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या पोलिस व इतर सात जणांना उडविले व घटनास्थळावरून पळ काढला. या धडकेत पोलिस कर्मचारी जयंत शेरेकर हे गंभीर जखमी झाले. लागलीच पोलिस शेरेकर यांच्यासह जखमींना पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

उपचारादरम्यान जयंत शेरेकर या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर प्राथमिक उपचारानंतर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडविणारी कार पारशिवनी पोलिसांनी जप्त केली. परंतु, कारमधील व्यक्ती फरार आहेत. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहेत.