
नागपूर : बेसा, बेलतरोडी भागात मॉन्सूनपूर्व बरसला!
नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीत सोमवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास दक्षिण नागपुरातील बेसा, बेलतरोडीसह आजूबाजूच्या परिसरात मेघगर्जनेसह दणकेबाज पाऊस बरसला. पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनल्याने उकाड्यामुळे घामाघूम झालेल्या नागपूरकरांना सुखद दिलासा मिळाला.
शहरात दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ चालल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. दक्षिण नागपुरातील बेसा, बेलतरोडीसह या भागांतील अनेक ठिकाणी १५ ते २० मिनिटे मेघगर्जनेसह जोरदार मृगधारा बरसल्या.
पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आडोश्याचा आधार घ्यावा लागला. त्याचवेळी हा पाऊस सुखावणारादेखील होता. गेल्या अनेक दिवसांपासून सूर्य तापत असल्यामुळे नागपूरकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत. आजच्या सरींनी तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. मंगळवार व बुधवारीही विदर्भात मॉन्सूनपूर्व सरींचा इशारा देण्यात आला आहे.
मॉन्सूनबद्दल संभ्रमाचे वातावरण
दरम्यान, दक्षिण-पश्चिम मॉन्सूनची वेगाने वाटचाल सुरू असून, मॉन्सूनने महाराष्ट्रातील मराठवाड्यासह आणखी काही भाग व्यापला आहे. त्यामुळे विदर्भात मॉन्सूनचे केव्हा आगमन होईल, याबद्दल बळीराजासह सर्वसामान्यांमध्येही सध्या कमालीची उत्सुकता आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या संकेतस्थळावर मॉन्सून येत्या ४८ तासांत विदर्भात पोहोचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात हवामान विभागाचे संचालक एम. एल. साहू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाला आणखी एक आठवडा लागेल, असे सांगितले. त्यामुळे मॉन्सूनबद्दल सध्यातरी संभ्रमाचे वातावरण आहे.
Web Title: Nagpur Pre Monsoon Rains In Besa Beltarodi Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..