Nagpur : राज्यात मोठ्या प्रकल्पाचे पंतप्रधानांचे आश्वासन ; मुख्यमंत्री शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

Nagpur : आमचे सरकार उद्योगांना चालना देणारे ; मुख्यमंत्री शिंदे

नागपूर : कोणताही प्रकल्प तीन चार महिन्यांत येतो अन् जातो, असे होत नाही. औद्योगिक प्रकल्प म्हणजे जादुची कांडी नाही. आरोप करायचे तर कुणीही करू शकतो. परंतु आमचे सरकार उद्योगांना चालना देणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात मोठ्या उद्योग आणण्याचे आश्वासन राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केला.

भंडारा येथे विकास कामांच्या भूमिपूजनासाठी जाताना ते विमानतळावर प्रसारमाध्यमासोबत बोलत होते.ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील कामे प्रलंबित होती त्यांना चालना दिली जात आहे. राज्याचा सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. रखडलेल्या प्रकल्पांना पुढे नेण्याचे काम करतोय. लवकरच गेल्या चार महिन्यात आम्ही केलेली कामे दिसतीलच, शिवाय मागील अडीच वर्षात ‘त्यांनी’ काय केले, हेही दिसेल, असे नमूद करीत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दोन हजार कोटी रुपये दिले. यातून राज्याचा सर्वांगिण विकास करणार असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ‘मोठे नेते आहेत’ एवढेच बोलून त्यांनी विषय संपवला.

आव्हाडांवर कारवाईत हस्तक्षेप नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मॉलमध्ये मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली. यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हाड यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर केली असल्याचे सांगितले. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कीर्तीकरांच्या अनुभवाचा लाभ

ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, कीर्तीकर ज्येष्ठ नेते व खासदार असून त्यांच्या अनुभवाचा आम्हाला व राज्यालाही फायदा आम्हाला होईल.