नागपूर : मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन

नागपूर : मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : साहित्यिक त्याच्या कलाकृतीबाबत किती संवेदनशील असतो आणि प्रत्येक कलाकृतीवर किती जिवापाड प्रेम करतो याची प्रचिती दंदे हॉस्पिटलमध्ये आली. ज्येष्ठ साहित्यिक सुभाषिनी कुकडे यांनी ‘मॉम यु आर ग्रेट’ या कलाकृतीची निर्मिती केली. परंतु, प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ‘आयसीयू’त असताना त्यांनी पती मधुकर यांच्याकडे कथासंग्रह प्रकाशनाची इच्छा व्यक्त केली होती. इहलोकाच्या वाटेवर असलेल्या आपल्या अर्धांगिनीची इच्छा पूर्ण करीत मधुकर कुकडे यांनी ‘आयसीयू’ मध्येच प्रकाशन सोहळा आयोजित केला. कथासंग्रहाच्या प्रकाशनानंतर काहीच तासात सुभाषिनी यांनी समाधानाने जगाचा निरोप घेतला.

कोरोना झाल्याने ‘मॉम यु आर ग्रेट’चा प्रकाशन सोहळा दोनवेळा पुढे ढकलावा लागला होता. गेल्यावर्षीच त्यांना आजाराने गाठले. फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेल्या सव्वा महिन्यापासून शहरातील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आजाराच्या काळात सुभाषिनी यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाबाबत पती मधुकर कुकडे यांच्याकडे बऱ्याचदा बोलल्या होत्या. आठ दिवसांपूर्वी प्रकृती अचानक खालावल्याने मधुकर कुकडेसुद्धा कासावीस झाले.

मृत्यूच्या काही वेळेआधी कथासंग्रहाचे प्रकाशन

प्रकृती गंभीर असताना रुग्णालयात प्रकाशन कसे करावे, असा मोठा प्रश्न उभा ठाकला. मधुकर यांच्या जिवाची घालमेल डॉ. पिनाक दंदे यांनी हेरली. ‘आयसीयू’ मध्येच कथासंग्रहाचे प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला. मधुकर कुकडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर पाहुण्यांना या सोहळ्याला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने होकार दर्शविला आणि ‘आयसीयू’मध्येच हा छोटेखानी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी, काँग्रेसचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा या भावनिक क्षणामुळे भारावले होते. सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, बाबूराव तिडके, डॉ. दंडे फाउंडेशनचे पिनाक दंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाषिनी कुकडे यांची ही इच्छा पूर्ण होताच मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, त्यांचे आणखीन एक पुस्तक छपाईच्या प्रक्रियेमध्ये असून त्याचेसुद्धा लवकरच प्रकाशन करण्याचा मानस मधुकर कुकडे यांनी व्यक्त केला आहे. सुभाषिनी कुकडे यांचे आजवर सहा पुस्तक प्रकाशित झाले आहेत.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

"पुस्तक प्रकाशित होऊ शकले नसल्याने तिचा जीव कासावीस होत होता. बरेवाईट होण्यापूर्वी पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी तिची इच्छा होती. पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि मन तृप्त झाले. सुभाषिनीला अजूनही बरेच काही लिहायचे होते."

-मधुकर कुकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

loading image
go to top