नागपूर : बावनकुळेंना राजेंद्र मुळक देणार आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule and Rajendra Mulak

नागपूर : बावनकुळेंना राजेंद्र मुळक देणार आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपने शुक्रवारी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या दोघांमध्ये विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतरही कॉंग्रेसच्या गोटात शांतता असल्याने शहरातील नेत्यांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. एवढेच नव्हे काल शुक्रवारी उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित नव्हते. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, शहर कॉँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीच चर्चा केली. आजही याबाबत चर्चा झाली. दिवसभर कॉंग्रेसमध्ये शांतता दिसून आली. परंतु, राजकीय गोटात राजेंद्र मुळक यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्याची चर्चा आहे. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुळक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले. राजेंद्र मुळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी अंतिम निर्णय होईल, असे नमूद केले. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

राजेंद्र मुळक यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकील रंगत वाढणार आहे. नागपूर मतदारसंघात एकूण ५६० मतदार आहेत. यातील निम्म्याहून अधिक मतदार भाजपकडे आहेत. कागदावरील आकड्यामुळे भाजपचे पारडे जड दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा व मतदारांची निष्ठा दोन्ही पणाला लागणार आहे. मुळक यांच्यासारखा उमेदवार पुढे असल्याने भाजपला मतदारांना गृहित धरणे महागात पडण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपलाच अधिक सावध राहावे लागणार आहे.

सोमवारी भाजपचे शक्तीप्रदर्शन

भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता बावनकुळे आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघतील, असे भाजपचे प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी सांगितले. यावेळी भाजपचे सर्वच नेते, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने एकप्रकारे निवडणुकीपूर्वीचे हे एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच ठरणार आहे.

loading image
go to top