
Nagpur : रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादी दावा ठोकणार ; दोन्ही काँग्रसमध्ये बिनसणार
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा केला जाणार आहे. या संदर्भात सोमवारी (ता.५) मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सर्व डेटा घेऊन बोलावण्यात आले आहे. या जागेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये बिनसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या सर्वच राजकीय पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेसने आजपासूनच लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांना प्रारंभ केला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरवण्याच्या चर्चा सुरू आहे. मध्यंतरी तीनही पक्षांना प्रत्येकी १६ जागा लढाव्या असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र या आकड्यावर कोणाची संमती होण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
रामटेकवर राष्ट्रवादी दावा ठोकणार
स्थानिक राजकीय परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी १९ जागा मागितल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.
पूर्व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचा एकही खासदार नाही. गोंदिया-बुलढण्यात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यापूर्वी निवडून आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर नाना यांनी हा मतदारसंघ सोडून नागपूरमध्ये धाव घेतली होती. येथे पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या साकोली विधानसभा मतदारसंघात परतले आहेत. प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत. ते या जागेवर दावा करण्याची दाट शक्यता आहे. पटोले याच जिल्ह्याचे असल्याने ते सहजासहजी ही जागा सोडणार नाहीत. त्यामुळे दुसरा पर्याय म्हणून रामटेक लोकसभा जागेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जाणार आहे.
रामटेक लोकसभेमधील काटोल-नरखेड आणि हिंगणा असे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. माजी मंत्री रमेश बंग, काही जिल्हा परिषद सदस्यही या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे इतर जागांच्या तुलनेत रामटेक लढणे सोयीचे असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गोंदिया-भंडारा मिळावा याकरिता ही राष्ट्रवादीची स्टॅटेजी असल्याचे बोलले जात आहे.