नागपूर : १६ विद्यार्थ्यांसह स्कूल व्हॅन खड्ड्यात

नागरिकांच्या मदतीमुळे अनर्थ टळला, दोन मुले जखमी
Nagpur road pits School van accident
Nagpur road pits School van accident

नागपूर : जोरदार पाऊस सुरू असताना विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन निघालेली स्कूल व्हॅन घोगली रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परिसरातील नागरिकांनी लगेच धाव घेत विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले.  ही घटना सोमवारी आठ वाजता बेसा परिसरात घडली. यावेळी शहरात जोरदार पाऊस कोसळत होता.

दररोज सकाळी व्हॅनच्या माध्यमातून बेसा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात येते. परिसरात रॉयल गोंडवाना, पोद्दार आणि संचेती आणि अन्य काही शाळा आहेत. त्यामुळे या रस्त्यावर स्कूल व्हॅनची मोठी वर्दळ असते. सकाळी जोराचा पाऊस असतानाही सकाळी ८ वाजताच्या सुमारास शाळेने अचानक सुटी दिल्यामुळे एक व्हॅन (एमएच४०, वाय- ७००७) १६ विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात होती. घोगली परिसरात चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन थेट रिकाम्या प्लॉटमध्ये साचलेल्या पाण्यात शिरली. व्हॅनमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना दुखापत झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी धावून व्हॅनमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. काही विद्यार्थ्यांना बाजूच्या स्वामीधाममध्ये नेण्यात आले. तर देवांश लांजेवार (वय १४), लावण्या कोपरे (१३) या दोन विद्यार्थ्यीनींना मानेवाडातील केशव हॉस्पिटल येथे नेले.

चार महिन्यातील तिसरी घटना

घोगलीत गेल्या चार महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. अरुंद रस्ते असूनही सुसाट धावणारे ट्रक, स्कूल बस, स्कूल व्हॅन त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांचे पायी चालणेही कठीण झाले असून रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

क्षमता १२ ची; कोंबतात १६!

प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार व्हॅनमध्ये १२ विद्यार्थी बसविणे आवश्‍यक आहे. मात्र, व्हॅनचालक पैशाच्या लालसेपोटी त्यात १५ ते १६ विद्यार्थी बसवितात. मात्र, त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येते.

वाहनचालक ताब्यात

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पालकही आल्याने काहीवेळ गोंधळ उडाला. पोलिसांनी वाहनचालक प्रकाश शामराव मोतीकर याला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. गौरव तरवडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही व्हॅन असून त्याच्या या परिसरात बऱ्याच व्हॅन चालत असल्याची माहिती आहे.

शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा

रविवारी रात्रभर पाऊस पडल्याने या भागातील नदी, नाले तुडूंब भरले होते. सुटीचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने रविवारी रात्रीच पालकांना कळविला असता तर कदाचित ही घटना टळली असती. शाळेला सुटी असल्याचे शाळा व्यवस्थापनाने कळविलेच नाही. शाळेत गेल्यानंतर सुटी असल्याचे सांगण्यात आले, असे या घटनेतील एका विद्यार्थ्याने सांगितले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु या घटनेतून शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा उघड झाला.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

या रस्त्यावर पोद्दार, रॉयल गोंडवाना, संचेती शाळा असून सकाळी व दुपारी तीन वाजताच्या सुमारास या शाळांमध्ये मुलांना घेऊन जाणाऱ्या व येणाऱ्या स्कूल बस, स्कूल व्हॅनसह इतर किरकोळ वाहनांचीही वर्दळ असते. त्यामुळे या दोन वेळेला येथे वाहतूक पोलिस नियुक्त करण्याची मागणी अनेकदा बेलतरोडी व हुडकेश्वर पोलिस स्टेशनला करण्यात आली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अपघात होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राजूरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com