Nagpur : नागपूरकरांच्या डोळ्यापुढे अंधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : नागपूरकरांच्या डोळ्यापुढे अंधार!

नागपूर : शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील गिट्टी निघाली असून नव्या सिमेंट रोडवरही विविध साहित्याचा पसारा पडला असल्याने धुलीकणाने नागपूरकरांच्या नाकीनऊ आणले आहे. जड वाहनाने ओव्हरटेक केल्यानंतर उडणारी धूळ थेट डोळ्यांत शिरत असल्याने दुचाकीचालकांना पुढील काहीही दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. धुळीमुळे डोळ्यांसह घसा, त्वचा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत असून चिमुकल्यांमध्ये अस्थमाही वाढत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते होत आहेत. मेडिकल चौक ते क्रीडा चौक ते रेशीमबाग चौक या रस्त्याचे मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. या रस्त्याची गिट्टी निघाली असून मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. असाच प्रकार अमरावती मार्गावरही दिसून येत आहे. येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. त्यामुळे खोदकाम करण्यात आले. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाडी ते बर्डीपर्यंत रस्त्याची गिट्टी निघाली असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

अशीच स्थिती मानेवाडा ते बेसा तसेच काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण केलेल्या शताब्दी चौक ते बेलतरोडी रस्त्यांवरही आहे. रामनगर ते गोकुळपेठ चौक रस्त्यावरील गिट्टी निघाली मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.

नागपूरकरांच्या डोळ्यापुढे अंधारी!

याशिवाय काही सिमेंट रस्त्यांचे काम पूर्ण झाले. मात्र अजूनही आयब्लॉक लावण्यासाठी आणण्यात आलेली बारीक चुरी रस्त्यांवर कायम आहे. त्यामुळे या रस्त्यांवरही वाहने चालविणेच नव्हे तर बाजूच्या फुटपाथवरून पायी चालणेही कठीण झाले आहे. साधी कारही दुचाकीधारकाच्या पुढे गेल्यानंतर सर्व धूळ दुचाकीधारक तसेच त्याच्यासोबत असलेल्या लहान मुले महिलांच्या डोळ्यात जात आहे. फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही हा त्रास सोसावा लागत आहे. हेच नव्हे तर धूळ नाक, तोंडातून घशात शिरत असून नागरिकांत विविध आजार कायमचे घर करीत असल्याने शहर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

चिमुकल्यांत त्वचारोग

धुळीमुळे केवळ डोळेच नाही तर लहान मुलांत मोठ्या प्रमाणात खाज, त्वचेवर लाल पुरळ येण्यासारखे आजारही गेल्या काही वर्षात वाढले आहेत. चेहऱ्यावर पांढरे चट्टे, अंगाला खाज सुटणे अशा आजारांनी ग्रस्त चिमुकल्यांची पालकांसोबत त्वचारोगतज्ञांकडे गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिमुकल्यांचे फिरणेही शहरात कठीण झाल्याचे चित्र आहे.

बहिरेपणाचीही भीती

सध्या धुळीमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. धूळ एलर्जी वाढविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शिंक येणे, डोळ्यांतून पाणी येणे, त्यानंतर कोरडा खोकला सुरू होतो व त्याचे रुपांतर अस्थमासारख्या आजारात होते. नाक तसेच घशात इन्फेक्शन झाल्यास कानावरही त्याचा परिणाम होऊन श्रवणक्षमताही कमी होण्याची शक्यता कान, नाक, घसातज्ज्ञांनी नमुद केले.